देवगांव (तुकाराम रोकडे) : यंदाच्या पावसाळी हंगामातील परतीच्या पावसाचा कालावधी वाढल्याने आंबा पिकावर परिणाम होणार असून उशिराने आंब्याच्या झाडांना मोहोर येण्याच्या शक्यतेने शेतकरी चिंतातूर झाला आहे.
नाशिक जिल्ह्यात यावर्षी परतीच्या पावसाने नोव्हेंबर अखेरीस आणि डिसेंबरच्या सुरुवातीस हजेरी लावल्याने तालुक्यातील भात उत्पादक शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले असून भातशेती पूर्णपणे उद्ध्वस्त झाला आहे. अशातच परतीच्या पावसाचा कालावधी यावर्षी वाढल्याने याचा परिणाम आंबा फळपिकांवर होण्याची शक्यता आहे. आंबा पिकाला उशिरा मोहोर येऊन आंबा उत्पादन जून महिन्यापर्यंत लांबण्याची शक्यता शेतकऱ्यांना सतावू लागली आहे.
दरवर्षी निसर्गाचा वाढत चालेला लहरीपणा, तसेच लांबत असलेला पाऊस, त्यामुळे वातावणात होणारा बदल यांचा परिणाम हंगामी पिकांवर मोठ्या प्रमाणावर होताना दिसत आहे. साधारणपणे सप्टेंबर महिन्यात परतीच्या पावसाला सुरुवात होते, मात्र यावर्षी पावसाने नोव्हेंबर - डिसेंबरपर्यंत हजेरी लावली असल्याने शेतकऱ्यांची अवस्था नाजूक झाली आहे.
नोव्हेंबर महिन्यात मोठ्या प्रमाणात थंडीला सुरुवात होऊन आंबापिकाला मोहोर येण्यास सुरुवात होत असते. मात्र, यावर्षी नोव्हेंबरमध्ये पाहिजे तेवढी थंडी नसल्याने आंब्याच्या झाडांना उशिराने मोहोर येण्याची शक्यता असून परिणामी आंबा हंगाम लांबण्याची शक्यता बागायतदारांकडून व्यक्त करण्यात येत आहे. त्यामुळे आंबे तयार होण्यास जून उजाडण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
----------------------------
३० ते ३५ दिवस उशिराने
नोव्हेंबर महिन्यात थंडी पडण्यास सुरुवात होते. तर, डिसेंबर महिन्यात मोहोर येण्यास सुरुवात होत असते. मात्र, अद्याप हवी तशी थंडी नसल्याने आंब्याला मोहोर येण्याचा हंगाम पुढे सरकण्याची शक्यता असून याचा परिणाम आंबापिकावर होऊन आंब्याचे पीक ३० ते ३५ दिवस उशिराने येण्याची शक्यता शेतकऱ्यांकडून वर्तवली जात आहे. जिल्ह्यातील आंबा बागायतदार यामुळे अडचणीत सापडले आहेत.