नाशिक : पावसाळ्यासोबत आलेल्या आणि चार महिने नाशिककरांना त्रस्त करून सोडलेल्या रोगराईचे वातावरण अखेर संपुष्टात आले आहे. गुलाबी आणि आरोग्यदायी थंडीमुळे रुग्णसंख्येत घट झाली आहे. गेल्या दहा दिवसांत स्वाइन फ्लूचा फक्त एकच रुग्ण आढळला असून, डेंग्यूचे ३० रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे प्रशासनानेदेखील सुटकेचा नि:श्वास सोडला आहे. पावसाळ्यात सुरू झालेल्या रोगराईने उच्छाद मांडला होता. स्वाइन फ्लूमुळे सुमारे ६० जणांना प्राण गमवावे लागले आहेत. (यात महापालिकेच्या हद्दीबाहेरील परंतु शहरात उपचार घेताना मृत्यू पावलेल्यांचाही समावेश आहे.) गेल्या महिन्यातदेखील कधी पाऊस तर कधी कडक ऊन या वातावरणामुळे स्वाइन फ्लूच्या विषाणूंना पोषक वातावरण होते. मात्र आता बदललेल्या वातावरणाचे अनुकूल परिणाम दिसून येत आहेत. १ ते १० नोव्हेंबर या कालावधीत स्वाइन फ्लूचा एक रुग्ण आढळला आहे. गेल्या संपूर्ण आॅक्टोबर महिन्यात एकूण ८१ रुग्ण आढळले होते. त्यातील ४० रुग्ण तरी पहिल्या पंधरवड्यात आढळले होते. तर सप्टेंबर महिन्यात १३६ रुग्ण आढळले होते. मात्र हे रुग्ण घटत गेल्यानंतर आता दहा दिवसांत केवळ एकच रुग्ण आढळला आहे. तसेच दहा दिवसांत स्वाइन फ्लूमुळे एकाही रुग्णाचा मृत्यू झाला नसल्याचे महापालिकेच्या आरोग्य विभागाने स्पष्ट केले.स्वाइन फ्लूच्या रुग्णांची संख्या मर्यादित मात्र मृत्यूचे प्रमाण अधिक तर डेंग्यूच्या रुग्णांची संख्या जास्त त्या तुलनेत मृत्यूचे प्रमाण नगण्य होते. या हंगामात डेंग्यूमुळे एकाचा बळी गेल्याची मनपात नोंद आहे. तथापि, रुग्ण संख्या मात्र अधिक होती. यंदा दहा दिवसांत ३० रुग्ण आढळले असले तरी यापूर्वी म्हणजे गेल्या महिन्यात १२७ तर सप्टेंबर महिन्यात १६५ रुग्ण आढळले होते. रुग्ण संख्या घटल्याने प्रशासनाने सुटकेचा नि:श्वास सोडला आहे. प्रशासन सातत्याने रोषाला सामोरेशहरातील रोगराईमुळे प्रशासनाला सातत्याने रोषाला सामोरे जावे लागत होते. गेल्या महिन्यात झालेल्या महासभेत रोगराई याच विषयावर प्रशासनाला धारेवर धरण्यात आले होते. तर पंचवटीतील एका नगरसेवकाच्या सासऱ्याला डेंग्यू होऊनही त्याकडे दुर्लक्ष केल्याच्या कारणावरून वैद्यकीय अधीक्षक डॉ. जयराम कोठारी व एका वैद्यकीय अधिकाºयाच्या निलंबनाचा ठराव महासभेत करण्यात आला होता. डॉ. कोठारी यांचे निलंबन झाले नसले तरी त्यांना पदावनत करून बदली करण्यात आल्याने त्यांचे बोटावर निभावले होते. तर महापालिकेला जनजागृती मोहीमही राबविण्यात आली आहे.
थंडीमुळे शहरातील रोगराई अखेर संपुष्टात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 13, 2018 1:06 AM