लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : नाशिक कृषी उत्पन्न बाजारसमितीतून गुजरात राज्यात मोठया प्रमाणात फळभाज्यांची निर्यात होत असल्याने बाजारभाव तेजित आले आहेत. काही दिवसांपुर्वी झालेल्या पावसामुळे शेतातील पिक नाश पावल्याने आवक काही प्रमाणात घटली आहे. एकीकडे आवक घटली तर दुसरीकडे बाजारभाव तेजित आल्याने सर्वसामान्य ग्राहक हवालदिल झाले आहेत.बाजारसमितीत वांगी, भोपळा, गिलके, दोडका, कारले, ढोबळी मिरची, टोमॅटो, या फळभाज्यांची आवक होत आहे. नाशिक बाजारसमितीतून गुजरात राज्यात शेतमालाला मागणी वाढलेली असल्याने बाजारभावात तेजी निर्माण झालेली आहे. ढोबळी मिरची ३० रूपये प्रति किलो, लामडी वांगी ५० रूपये, दोडका ४० रूपये, भोपळा ३० रूपये नग, हिरवे वांगी ३५ रूपये, लाल वांगी ४० रूपये प्रति किलो असा बाजारभाव मिळत असल्याचे भाजीपाला व्यापारी उमापती ओझा यांनी सांगितले.पावसाने सध्या उघडीप दिलेली असली तरी नवीन फळभाज्या दाखल झाल्या नसल्याने बाजारभाव तेजित आहे. याशिवाय नाशिकच्या बाजारसमितीतून गुजरातला शेतमाल निर्यात केला जात असुन गुजरात राज्यात या शेतमालाला व्यापाºयांकडून उठाव अधिक असल्याने बाजारभाव सध्या तेजित आहेत. आगामी काही दिवसात सर्वच फळभाज्या मोठया प्रमाणात दाखल होण्याची शक्यता असल्याने बाजारभाव घसरण्याची शक्यता असल्याचे बाजारसमिती सुत्रांनी सांगितले. बाजारसमितीत किमान ४० रूपये प्रति किलो बाजारभाव असलेल्या फळभाज्या किरकोळ बाजारात व हातगाडीवर ग्राहकांना ७० ते ८० रूपये प्रति किलो दराने खरेदी कराव्या लागत असल्याने ग्राहकांना आर्थिक फटका सहन करावा लागत आहे.
आवक घटल्याने फळभाज्या कडाडल्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 04, 2017 3:17 PM