गंगापूर : शेतीबरोबर जोडधंदा म्हणून दुग्ध व्यवसाय केला पाहिजे, खरे तर दुग्ध व्यवसाय हा शेतीला जोडधंदा नसून मूळ धंदा आहे. गाई वासरे पाळून दुग्ध व्यवसाय केला तर शेतकऱ्यांना नेहमी भेडसावणाºया आर्थिक समस्या दूर होतील. तसेच कर्जबाजारीपणा व शेतीला हमीभाव मिळत नाही म्हणून नैराश्य न होता पशुपालन करून शेतकºयांची अर्थिक परिस्थिती सुधारेल, असे प्रतिपादन जिल्हा परिषदेच्या उपाध्यक्ष नयना गावित यांनी केले. जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन विभाग व ग्रामपंचायत दुगाव यांच्या संयुक्त विद्यमाने संकरित वासरांचा मेळावा घेण्यात आला. यात होस्टन, जर्सी आणि देशी अशा तीन प्रकारचे गु्रप पाडण्यात आले होते. प्रत्येक गृपमधून १ ते ३ क्रमांक निवडून त्यांना रोख रक्कम व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. या कार्यक्रमाचे उद््घाटन जिल्हा परिषदेच्या उपाध्यक्ष नयना गावित यांच्या हस्ते करण्यात आले. प्रमुख पाहुणे म्हणून महिला व बाल कल्याण समिती सभापती अर्पणा खोसकर, पंचायत समिती सभापती रत्नाकर चुंभळे, उपसभापती कविता बेंडकोळी, दुगावच्या सरपंच पुष्पा जाधव, उपसरपंच स्वाती फडोळ हे होते. यावेळी पशुसंवर्धन अधिकारी डॉ. विष्णू गर्जे, जी. प. धनवटे, गटविकास अधिकारी पांडुरंग कोल्हे, माणिक शिंदे, सुनील थेटे, विष्णू वाघ, संजय थेटे, शशीकांत वाघ आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन व आभार डॉ. संतोष शिंदे यांनी केले. डॉ. योगेश नेहरे यांनी सुदृढ वासरांच्या पशुपालकांना क्रमांक ठरवून दिले.
दुगावला संकरित वासरांचा मेळावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 06, 2018 12:58 AM