इगतपुरी : विविध पार्ट्यांसाठी प्रसिद्ध आणि चर्चेत असलेला इगतपुरी तालुका रविवारी (दि. १३) पुन्हा एकदा हुक्का पार्टीने हादरला. तालुक्यातील त्रिंगलवाडी येथील परदेवी हद्दीतील माऊंटन शॅडो रिसॉर्टमध्ये रविवारी रात्री १ वाजेच्या सुमारास ग्रामीण पोलिसांनी छापा टाकत २० तरुणींसह ७५ जणांना हुक्का व अमली पदार्थांचे सेवन करताना रंगेहाथ पकडले आहे. यामध्ये मुंबईसह विविध राज्यांतील नागरिकांचा समावेश आहे. सोबत १८ देहविक्रय करणाऱ्या महिलांनाही ताब्यात घेण्यात आले आहे. याप्रकरणी इगतपुरी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, त्रिंगलवाडी येथील परदेवी हद्दीतील माऊंटन शॅडो रिसाॅर्ट येथे अमली पदार्थांसह हुक्का पार्टीचे रेवती हार्डवेअर स्पेअर पार्ट या कंपनीमार्फत आयोजन करण्यात आल्याची खबर ग्रामीण पोलीस अधीक्षक सचिन पाटील यांना मिळाली. तसेच मुंबईहून देहविक्रय करणाऱ्या १८ तरुणींनाही त्या ठिकाणी आणण्यात आले होते. त्यानुसार ग्रामीण पोलीस व स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने रविवारी (दि.१३) रात्री १ वाजेच्या सुमारास काही पंचांना हॉटेलमध्ये पाठवून खात्री करून घेतली. माहिती खरी असल्याचे लक्षात येताच पथकाने हॉटेलवर छापा टाकला. यावेळी पार्टी हाॅलमध्ये विविध टेबलवर हुक्कासह मद्यसेवन करताना काही पुरुष व महिला आढळून आल्या. पोलिसांनी यावेळी ५५ पुरुष व २० महिलांना हुक्का व अमली पदार्थांचे सेवन करताना ताब्यात घेतले. तसेच या ठिकाणावरून पोलिसांनी विदेशी दारू, हुक्के, सुगंधी तंबाखू हा मुद्देमाल हस्तगत केला. एका खोलीची तपासणी केली असता तेथे एक पुरुष व एक महिला आढळून आली. या महिलेची चौकशी केली असता तिने मुंबईहून शिल्पा उर्फ शालिहा सिराज कुरेशी व दीपाली महेश देवळेकर या १५ ते २० मुलींना देहविक्रीसाठी माऊंटन शॅडो रिसॉर्ट येथे घेऊन आल्याचे सांगितले. ताब्यात घेतलेले नागरिक हे विविध प्रांतांतील असल्याने त्यांची ओळखपरेड करण्यातच दिवस गेला. पोलिसांनी याप्रकरणी हुक्का, सिगारेट व तंबाखू उत्पादने व अनैतिक व्यापार प्रतिबंधक आदी नियमांन्वये गुन्हे दाखल केले आहेत.
इन्फो
आज न्यायालयात हजर करणार
पोलिसांनी हॉटेल मालक मनीष नयन झवेरीया (रा. विलेपार्ले, मुंबई), महेंद्र डोसाभाई मोमाया शाह (रा. शरणपूररोड, नाशिक) तसेच आयोजक आशिष नरेंद्र छेडा, (रा. सी ९ रंजन, एस. व्ही. रोड, दहिसर ईस्ट, मुंबई), केतन चापसी गडा, (रा. खकर अपार्टमेंट, साईनगर, कांदिवली वेस्ट, मुंबई) यांच्यासह देहविक्रीसाठी महिला पुरवणाऱ्या शालिहा उर्फ शिल्पा सिराज कुरेशी (रा. बीडीडी चाळ बी. नं. ४३, जांबोरी मैदान, मुंबई) व दिपाली महेश देवळेकर (रा. गोरेगाव, हिरामणनगर, मुंबई) यांच्यासह ७५ जणांविरुद्ध गुन्हे दाखल केले आहेत. या सर्वांना सोमवारी (दि. १४) इगतपुरी न्यायालयात हजर केले जाणार असल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली.