नाशिक : राज्य निवडणूक आयोगाने नगरपालिका निवडणुकीचे नामांकन आॅनलाइन पद्धतीने निवडणूक आयोगाच्या वेबसाइटवर भरण्याची सक्ती केली असली तरी, सोमवारी पहिल्या दिवशी आयोगाच्या बेवसाइटवरच नगरपालिकेच्या नामांकनाची अपुरी माहिती समाविष्ट करण्यात आल्याने पहिल्या दिवसाच्या मुहूर्तावर अर्ज दाखल करू पाहणाऱ्या उमेदवारांचा पुरता हिरमोड झाला. सकाळी अकरा ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत खटाटोप करूनही जिल्ह्णातील एकाही उमेदवाराचा अर्ज आयोगाच्या वेबसाइटने स्वीकारला नाही. जिल्ह्यातील सहा नगरपालिकांच्या निवडणुकीसाठी सोमवारपासून नामांकन अर्ज दाखल करण्यास सुरुवात झाली असून, सकाळी अकरा ते दुपारी तीन वाजेपावेतो निवडणूक निर्णय अधिकाऱ्याकडे उमेदवारांनी कागदपत्रांच्या पूर्ततेसह अर्ज दाखल करणे आयोगाने अपेक्षित मानले असून, निवडणूक आयोगाकडे अर्ज दाखल करण्यापूर्वी उमेदवाराने निवडणूक आयोगाच्या वेबसाईटवर नामांकन दाखल करणे अनिवार्य केले आहे. वेबसाईटवर संपूर्ण माहिती व कोणत्या प्रभागासाठी तसेच संवर्गातून अर्ज दाखल केला याची नोंद केल्यानंतर अर्ज भरल्याची पोच पावती उमेदवाराने निवडणूक अधिकाऱ्याकडे सादर करणे क्रमप्राप्त आहे. यंदा पहिल्यांदाच आयोगाने हा निर्णय घेतल्यामुळे उमेदवारांची धावपळ उडाली. अनेकांनी सकाळी अकरा वाजेपासून आयोगाच्या वेबसाईटवर आॅनलाइन माहिती भरण्याचा प्रयत्न केला असता, उमेदवाराबाबतची संपूर्ण माहिती वेबसाईटवर लोड होत होती. तथापि, प्रभाग क्रमांक व अर्ज भरणाऱ्यांचा संवर्ग याची माहितीच वेबसाईटवर दिसत नसल्याने उमेदवारांनी भरलेली सर्व माहिती निरर्थक ठरत होती. यासंदर्भात काही उमेदवारांनी थेट निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे तक्रार केली असता, त्यांनीही खात्री केल्यावर तक्रारीत तथ्य आढळून आले. याबाबत राज्य निवडणूक आयोगाला अवगत करण्यात आल्यावर त्यांनीही तांत्रिक चूक मान्य करीत लवकरच माहिती उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले, परंतु अर्ज भरण्याची दुपारी तीन वाजेची मुदत टळून गेल्यावरही आयोगाचा दोेष दूर होऊ शकला नाही. त्यामुळे पहिल्या दिवशीच पहिला अर्ज भरण्याच्या तयारीत असलेल्या उमेदवारांचा हिरमोड झाला. सायंकाळी पाच वाजेच्या दरम्यान सदरची वेबसाईट पुन्हा परिपूर्ण माहितीने सुरू करण्यात आल्याचे आयोगाकडून सांगण्यात आले, मात्र त्याची सत्यता कोणी पडताळून पाहिली नाही. दरम्यान, सोमवारी पहिल्या दिवशी इच्छुकांनी निवडणूक अधिकाऱ्यांकडून मोठ्या संख्येने अर्ज नेले.
उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आयोगाचा खोडा
By admin | Published: October 25, 2016 2:12 AM