नाशिक : जिल्ह्यातील मालेगावजवळचा गाळणा, तर अहमदनगरच्या जामखेड तालुक्यातील खर्डा किल्ला लवकरच कात टाकणार आहे. मुख्यमंत्र्यांनी केलेल्या घोषणेनुसार, या दोन्ही किल्ल्यांची दुरुस्ती, डागडुजीचा प्रस्ताव पुरातत्त्व विभागाने तयार केला असून, येत्या सोमवारी तो शासनाकडे रवाना होणार आहे. किल्ल्यांच्या डागडुजीचे प्रत्यक्ष काम पुढच्या पंधरवड्यात सुरू होण्याची चिन्हे आहेत. गड-किल्ल्यांची दुरुस्ती, डागडुजी व पुनर्बांधणी पुरातत्त्व विभागामार्फत केली जाईल, अशी घोषणा मुख्यमंत्री फडणवीस यांनी केली होती. त्यानुसार नाशिक पुरातत्त्व विभागाने मालेगाव तालुक्यातील गाळणा व नगर जिल्ह्यातील खर्डा या किल्ल्यांची तूर्त निवड केली आहे. राज्याच्या प्रत्येक जिल्ह्यातून एक किल्ला या योजनेसाठी निवडला जाणार आहे. शासनाकडून गाळणा किल्ल्यासाठी ३ कोटी ३७ लाख, तर खर्डा किल्ल्यासाठी ३ कोटी ८० लाख रुपये मंजूर आहेत. या कामांच्या निविदा शासनाकडे पाठवण्याचे काम सध्या सुरू आहे.
गाळणा, खर्डा किल्ला टाकणार कात !
By admin | Published: February 18, 2016 11:48 PM