नाशिकरोड : दत्त मंदिर रोडवरील एसटी महामंडळाचा मोकळा भूखंड डम्पिंग ग्राउंड बनल्याने परिसरातील रहिवाशांचे आरोग्य धोक्यात आले आहे. मोकळ्या भूखंडावरील झाडाझुडपांमध्ये अनेक गैरप्रकार चालत असल्याने पोलीस आयुक्त व मनपा आयुक्तांनी लक्ष घालावे, अशी मागणी रहिवाशांनी केली आहे. दत्त मंदिर रोडवरील भर लोकवस्तीत एसटी महामंडळाचा भूखंड कुंपणाअभावी मोकळा पडून आहे. त्या भूखंडावर मोठ्या प्रमाणात बाभळीच्या झाडांचे जंगल वाढले आहे. इमारतीच्या बांधकामासाठी खोदाई करताना निघालेली माती किंवा इमारत तोडल्याचे रॅबिट या मोकळ्या भूखंडावर आणून टाकले जात असल्याने मातीचे व रॅबिटचे छोटे-छोटे डोंगर तयार झाले आहेत. मनपाचे रस्ते, गटारी आदी कामातील खोदाईची माती या ठिकाणी आणून टाकली जाते. तसेच सोमाणी उद्यान परिसरातील विक्रेते, अनेक हॉटेल, हातगाडी चालक उरलेले अन्नपदार्थ आणून टाकतात. त्यामुळे मोकाट कुत्रे, जनावरे व दुर्गंधीचा उपद्रव रहिवाशांना सहन करावा लागत आहे. मनपाकडून सार्वजनिक ठिकाणी केरकचरा, माती टाकणाºयांवर कारवाई केली जात नसल्याने एसटी महामंडळाचा भर लोकवस्तीत असलेला हा मोकळा भूखंड डम्पिंग ग्राउंड झाला आहे. यामुळे परिसरातील रहिवासी, विकास मतिमंद शाळेचे विद्यार्थी व मनपा शाळा क्र. १२५ च्या मैदानावर फिरण्यास येणारे नागरिक, महिला त्रस्त झाल्या आहेत. मनपाने एसटी महामंडळ प्रशासनास मोकळ्या भूखंडास कम्पाउंड करण्याची नोटीस बजावून कारवाई करावी, तसेच जंगलासारखी वाढलेली व गैरप्रकाराला आमंत्रण देणारी बाभळीची झाडे तोडण्यात यावी. मनपा आयुक्तांनी यात गांभीर्याने लक्ष घालावे, अशी मागणी केली जात आहे.पोलीस आयुक्तांनी लक्ष घालावेएसटी महामंडळाच्या या मोकळ्या भूखंडाच्या एका बाजूला कुंभमेळ्यात वर्कशॉप बांधण्यात आले होते. वर्कशॉपची इमारत पडून असल्याने तेथे मद्यपी व जुगारी टोळके बसत आहे. तसेच मोकळ्या भूखंडावरील बाभळीच्या झाडाच्या जंगलात गांजा, दारू, व्हाइटनर आदी अमली पदार्थ पिणारे बसलेले असतात. तसेच प्रेमीयुगुलांचे येथे अश्लील चाळे चालतात. त्यामुळे स्थानिक महिलांना खाली मान घालून जाण्याची वेळ येते. पोलिसांच्या गाड्या सायरन वाजवत येत असल्याने हे टवाळखोर पोलीस येण्याअगोदरच पळून जातात. पोलीस आयुक्तांनीच लक्ष घालून या ठिकाणी चालणाºया गैरप्रकाराला आळा घालावा, अशी मागणी केली जात आहे.
दत्त मंदिर रोडवरील मोकळा भूखंड बनला डम्पिंग ग्राउंड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 17, 2018 1:56 AM