घोटी : इगतपुरी तालुक्यातील विविध प्रकारचा गावठी तांदूळ, गावठी फळे आणि विषमुक्त अन्य शेतमालाला नाशिकच्या कृषी महोत्सवात प्रचंड प्रतिसाद लाभत आहे. जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातून नागरिकांनी इगतपुरी तालुक्यातील सेंद्रिय बाजारपेठेला भेट देऊन विक्र मी खरेदी केली.कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी आयोजित नाशिक येथील कृषी महोत्सवात इगतपुरीचे विविध शेतकरी गट आणि शेतक-यांमार्फत सेंद्रिय माल उपलब्ध करुन देण्यात आला आहे. इगतपुरी तालुक्यातील डोंगराळ भागातील आदिवासी शेतकरी अजूनही पारंपरिक शेतीच्या माध्यमातून विषमुक्त शेतीची परंपरा पुढे चालवत आहेत. सध्याच्या बदलत्या जीवनशैलीत कीटकनाशके, खते यांच्या भरमसाठ मा-याने शरीर संपदा धोक्यात आली आहे. त्यानुसार इगतपुरी तालुक्यात कृषी खात्याने सेंद्रिय शेतीसाठी प्रबोधन चालविले आहे. कृषिमहोत्सवात आदिवासी भागातील शेतक-यांचे ५ पेक्षा जास्त स्टॉल लावण्यात आले आहेत. यामध्ये सेंद्रिय पद्धतीने पिकवलेला विषमुक्त तांदूळ, हातसडीचा तांदूळ, बिन पॉलिशचा तांदूळ, वरई, नागली, गुळ, द्राक्ष, मशरूम, पापड, मसाले उपलब्ध आहेत. आगामी काळात थेट शेतक-यांशी संपर्क साधून सेंद्रिय भाजीपाला मिळवणार असल्याचे सांगण्यात आले. टेरेस आणि घरातल्या घरात सेंद्रिय भाजीपाला पिकवण्याचे सुलभ तंत्र इगतपुरीच्या शेतक-यांनी सांगितले.शेतकरी बचत गट आणि शेतक-यांना इगतपुरीचे तालुका कृषी अधिकारी संजय शेवाळे, पंचायत समितीचे कृषी अधिकारी नंदकुमार अहिरे, विस्तार अधिकारी साहेबु देशमुख, कृषी सहाय्यक हितेंद्र मोरे, सुहास भालेराव, आर. डी. जोशी, प्रदीप नवले, अर्चना सातपुते यांनी मार्गदर्शन केले. या महोत्सवात इगतपुरी तालुक्यातील सेंद्रिय शेती करणारे शेतकरी भाऊसाहेब गायकर, कचरू पाटील शिंदे, रामदास गायकर, भाऊसाहेब शिंदे आदींनी सहभाग घेतला. दरम्यान, कार्यक्र मात भरविर बुद्रुक येथील जय श्रीराम कृषी विज्ञान मंडळाला विशेष पुरस्कार वितरित करण्यात आला.अभूतपूर्व सहभागकृषी महोत्सवाच्या निमित्ताने शेतीनिष्ठ शेतक-यांच्या शेतमालाला बाजारपेठ उपलब्ध झाली आहे. सर्वच तालुक्यातील शेतक-यांनी ह्यामध्ये अभूतपूर्व सहभाग घेतला. नागरिकांच्या प्रतिसादामुळे शेतक-यांना उत्स्फूर्तपणे काम करायला आनंद वाटतो आहे.- संजीव पडवळ, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, नाशिक
हातसडीच्या तांदळाचा कृषि महोत्सवात डंका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 07, 2019 3:41 PM
इगतपुरी तालुका : विषमुक्त शेतीमालाला प्रतिसाद
ठळक मुद्देकृषिमहोत्सवात आदिवासी भागातील शेतक-यांचे ५ पेक्षा जास्त स्टॉल लावण्यात आले आहेत. यामध्ये सेंद्रिय पद्धतीने पिकवलेला विषमुक्त तांदूळ, हातसडीचा तांदूळ, बिन पॉलिशचा तांदूळ, वरई, नागली, गुळ, द्राक्ष, मशरूम, पापड, मसाले उपलब्ध आहेत