नाशिक : स्वेच्छानिवृत्ती हा प्रत्येक कर्मचाऱ्याचा अधिकार असला, तरी ती घेऊ द्यायची की नाही याबाबत संबंधित संस्थेचा आस्थापना विभाग कशा क्लृप्त्या लढवत असतो, याचे उदाहरण महापालिकेच्या बिटको रुग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्याच्या स्वेच्छानिवृत्ती प्रकरणाने समोर आले आहे. एकीकडे आरोपीच्या पिंजऱ्यात असल्याने स्वेच्छानिवृत्तीचा अर्ज मंजूर करता येणार नाही असे सांगणाऱ्या महापालिकेच्या प्रशासनाने, सदर अधिकाऱ्याची किती निकड आहे, अशी दुटप्पी भूमिका घेत स्वेच्छानिवृत्ती मागणाऱ्या वैद्यकीय अधिकाऱ्याची कोंडी केली आहे. नाशिकरोड येथील महापालिकेच्या बिटको रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी तथा निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. जयंत फुलकर यांनी स्वेच्छानिवृत्तीसाठी प्रशासनाकडे अर्ज केला आहे. महाराष्ट्र शासनाच्या नागरी सेवा नियमानुसार शासकीय कर्मचाऱ्याला तशी २० वर्षांची सेवा पूर्ण झाल्यावर नियुक्ती प्राधिकाऱ्यास तीन महिन्यांची लेखी नोटीस देऊन सेवेमधून केव्हाही निवृत्त होता येते. स्वेच्छेने सेवानिवृत्त होण्याबद्दल दिलेली नोटीस नियुक्ती प्राधिकाऱ्याने स्वीकारणे आवश्यक असते; परंतु डॉ. फुलकर यांच्या प्रकरणाबाबत महापालिका प्रशासनाने अजब भूमिका घेतली आहे. डॉ. फुलकर यांना शासन आदेशानुसार मासिक वेतनात व्यवसायरोध भत्ता लागू करण्यात आला असताना आणि त्यांनी खासगी व्यवसाय करणार नाही असे प्रतिज्ञापत्र लिहून दिले असतानाही ते खासगी वैद्यक व्यवसाय करत असल्याचे व त्यामुळे महापालिका रुग्णालयात पूर्णवेळ देता येत नसल्याचे निदर्शनास आल्याने त्यांच्याविरुद्ध खातेनिहाय चौकशी सुरू आहे. त्यामुळे डॉ. फुलकर यांना स्वेच्छानिवृत्ती मंजूर करता येणार नाही, असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. महापालिका प्रशासनाने डॉ. फुलकर यांना आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करतानाच त्यांची महापालिकेला किती निकड आहे, हेसुद्धा पटवून देण्याचा प्रयत्न केला आहे. नाशिकमध्ये आगामी काळात सिंहस्थ कुंभमेळा भरत असून, त्यावेळी वैद्यकीय सेवा पुरविण्याकरिता अनुभवी वैद्यकीय अधिकाऱ्यांची किती नितांत गरज आहे आणि पालिकेत अगोदरच वैद्यकीय अधिकाऱ्यांची संख्या कमी असल्याने तसेच डॉ. फुलकर यांना सुमारे २३ वर्षांचा अनुभव असल्याने त्यांच्यासारख्या अनुभवी वैद्यकीय अधिकाऱ्याची निकड असल्याची अगतिकताही व्यक्त केली आहे. एकीकडे आरोप ठेवायचे आणि दुसरीकडे त्यांच्या अनुभवाचे गुणगान गायचे, या पालिकेच्या दुटप्पी भूमिकेत डॉ. फुलकर यांची स्वेच्छानिवृत्ती मात्र अडकली आहे. (प्रतिनिधी)
स्वेच्छानिवृत्ती प्रकरणी पालिकेचा दुटप्पीपणा
By admin | Published: January 14, 2015 11:45 PM