नाशिक : सध्याच्या काळात कचरा ही सर्वात मोठी समस्या आहे. परंतु टाकाऊपासून टिकाऊ वस्तू तयार करण्याचे कौशल्य दाखवून काही व्यक्ती किंवा संस्था पर्यावरणाचे रक्षण करीत एकप्रकारे सामाजिक सेवेचे कार्यच करीत असतात. ज्योती-ज्योत फाउंडेशनच्या माध्यमातून टाकाऊतून टिकाऊ वस्तूंची निर्मिती करण्यात येत आहे. तसेच झोपडपट्टी विभागातील महिलांकरिता रोजगार निर्मिती करून त्यांना स्वत:च्या पायावर उभे करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. तयार कपडे वापरण्याची फॅशन असली तरी टेलरकडून कपडे शिवून घेण्यात येतात. विविध टेलर्सच्या दुकानांमधून कटिंग कपड्यांचे तुकडे जमा करून फाउंडेशनच्या माध्यमातून छोड्या कापडी पर्स, बटवे, पिशव्या आदी वस्तू तयार करण्यात येतात. या कामासाठी प्रिया सुगंध आणि त्यांच्या सहकारी कार्यरत आहेत. यासाठी त्यांनी झोपडपट्टी विभाग आणि कामगार वसाहतीमध्ये छोटे-छोटे बचतगट तयार केले आहेत. नाशिक शहरातील विविध भागातील महिला बचत गटाला काम जास्तीत जास्त मिळावे यासाठी प्रयत्न करतात. सदर बचत गटाच्या माध्यमातून तयार झालेले पर्स, गाऊन, ड्रेस, पिशव्या आदींची विक्रीसाठी या महिलांना परिवाराकडून सहकार्य मिळत आहे.
ज्योती-ज्योत फाउंडेशनकडून टाकाऊतून टिकाऊ वस्तू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 31, 2018 12:35 AM