नाशिक : दिंडोरी, त्र्यंबकेश्वरसह देशभरातील सर्व स्वामी समर्थ केंद्रांत मंगळवार, दि. १८ रोजी पासून सुरू असलेल्या अखंड नाम जप, यज्ञ सप्ताहाची आज, सोमवारी (दि. २४) स्वामी समर्थ पुण्यतिथीदिनी सांगता झाली. या सप्ताह काळात गुरुमाउली प. पू. अण्णासाहेब मोरे यांच्या आदेशान्वये सर्व केंद्रांवर लाखो सेवेकऱ्यांनी यावर्षी विपुल पर्जन्यमानासाठी विशेष सेवा केली. श्री स्वामी समर्थ पुण्यतिथीनिमित्त दिंडोरीत अण्णासाहेब मोरे यांनी, तर त्र्यंबकेश्वर येथील समर्थ गुरुपीठ येथे चंद्रकांतदादा मोरे यांनी सेवेकऱ्यांशी संवाद साधला.मंगळवारपासून (दि.१८) दिंडोरी, त्र्यंबकेश्वरसह महाराष्ट्रातील सर्व समर्थ केंद्रांवर व नरसोबावाडी, गाणगापूर, पीठापूर, कुरवपूर तसेच अनेक राज्यांमधील अनेक ठिकाणी श्री स्वामी समर्थ पुण्यतिथीनिमित्त अखंड नाम जप, यज्ञ सप्ताहास प्रारंभ झाला होता. सप्ताह काळात सर्व केंद्रांच्या माध्यमातून लाखो भाविकांनी सेवा दिली. श्री गुरुचरित्र, श्री स्वामीचरित्र सारामृत, श्री दुर्गासप्तशती, नवनाथ, भागवत कथा आदींची पारायणे करण्यात आली. गुरुचरित्र, स्वामीचरित्र व दुर्गासप्तशती या ग्रंथांचे महिला-पुरुष सेवेकऱ्यांकडून लाखापेक्षा अधिक पारायणे करण्यात आली. सप्ताह काळात विविध मंत्रांचा समुदायिक जप, आरती, औदुंबर प्रदक्षिणा, ध्यान, गीताई, मनाचे श्लोक, विष्णुसहस्त्रनाम, गणेश याग, मनोबोध याग, स्वामी याग, चंडी, रुद्र, मल्हारी याग, सत्यदत्तपूजन असे विविध धार्मिक कार्यक्रम झाले.दरवर्षीप्रमाणे स्वामी पुण्यतिथी सप्ताहात गुरुमाउली अण्णासाहेब मोरे यांनी सुचित केल्याप्रमाणे लाखो सेवेकऱ्यांनी पर्जन्यमान चांगले राहावे यासाठी पर्जन्य यागाच्या रुपाने मनोभावे सेवा केली. स्वामी समर्थ महाराजांच्या मूर्तीला सहस्त्र जलधारा अभिषेक केला तरी यावर्षी पुन्हा तो कृपा करेल याची खात्री नाही म्हणून सेवेकऱ्यांनी बेसावध न राहता सर्व केंद्रांवर पर्जन्यसुक्ताची सेवा पर्जन्यराजाचे आगमन होईपर्यंत व विपुल पर्जन्यवृष्टी झाल्यावरसुद्धा सुरुच ठेवावी, अशी सूचना गुरुमाउलींनी देशभरातील सेवेकऱ्यांंना यानिमित्ताने केली आहे. (प्रतिनिधी)
दुर्गासप्तशतीची पारायणे
By admin | Published: April 25, 2017 1:41 AM