नाशिक : कोरोनामुळे शाळा बंद असली तरी विद्यार्थ्यांचा अभ्यास व्हावा यासाठी शिक्षण विभागाने चक्क व्हॉट्स ॲपच्या आधारे ‘स्वाध्याय’
मालिका हा उपक्रम सुरू केला असून नाशिक जिल्ह्यातील जवळपास ६ लाख ७९ हजार विद्यार्थी या उपक्रमात सहभाग झाले असून सुमारे ३० टक्के
विद्यार्थ्यांकडे स्मार्ट फोन नाही, व्हॉट्स ॲप नाही. ते असले तरी ऐनवेळी इंटरनेटची रेंज नाही. त्यामुळे शिक्षण विभागाच्या स्वाध्याय मालिकेपासून हे विद्यार्थी वंचित राहत आहे.
पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांचा घरबसल्या अभ्यास व्हावा यासाठी राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेने स्वाध्याय (डिजिटल होम असेसमेंट) सुरू केला. सध्या या उपक्रमाचा १९ वा आठवडा सुरू आहे. मात्र १८ आठवड्यापर्यंत राज्यातील विविध जिल्ह्यातील लाखो विद्यार्थी या उपक्रमात सहभागी झाले असून नाशिक जिल्ह्यातही जवळपास ६० ते ७० टक्के विद्यार्थ्यी या उपक्रमात सहभागी झाले आहेत. प्रत्यक्षात जिल्ह्यातील पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांची संख्या जवळपास ९ लाख ७० हजार ५७४ पर्यंत आहे.त्यातील ७० टक्के म्हणजे ६ लाख ७९ हजार ४०२ विद्यार्थी स्वाध्याय उपक्रमात सहभागी होत आहेत. तर जवळपास २ लाख ९१ हजार १७२ विद्यार्थी या उपक्रमापासून वंचित आहेत. मात्र यातील काही विद्यार्थ्यांच्या शाळा गावात कोरोनाचा शिरकाव झालेला नाही. त्यामुळे अशा गावातील विद्यार्थी प्रत्यक्ष शाळेत जाऊन शिक्षण घेत आवश्यक तो सर्व गृहपाठही करीत आहेत.
---
अशी आहे आकडेवारी
जिल्ह्यातील एकूण विद्यार्थी - ९,७०, ७७४
स्वाध्यायमध्ये सहभागी विद्यार्थी - २,९१,१७२
स्वाध्याय सोडविणारे विद्यार्थी - २,९०,२१७
---
विद्यार्थी म्हणात...
स्वाध्याय उपक्रमामुळे शाळा बंद असतानाही अभ्यासक्रम पूर्ण करण्यास मदत होत आहे. स्वाध्यायमधील उणिवा शिक्षक लक्षात आणून देत असल्याने शिकविलेला अभ्यासक्रम सहज लक्षात राहतो.
-ऋषिकेश जाधव, विद्यार्थी
---कोरोनामुळे शाळा बंद असल्या तरी, ऑनलाइनच्या माध्यमातून शिक्षण सुरू आहे. व्हॉट्स ॲपद्वारे दर शनिवारी विषयनिहाय प्रश्नावली मिळत असून ही प्रश्नावली सोडवल्यानंतर आठवड्याचा अभ्यास पूर्ण होत आहे.
-ओमकार गायधनी,
विद्यार्थ्यांचा प्रतिसाद
राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेने व्हॉट्स ॲपच्या माध्यमातून दर शनिवारी स्वाध्याय उपक्रम सुरू केला आहे. या उपक्रमात जिल्ह्यातील ऑनलाइन शिक्षणाच्या प्रवाहात असलेले जवळपास ७० टक्के विद्यार्थी सहभागी झालेले आहेत. विद्यार्थ्यांचा या उपक्रमाचा चांगला प्रतिसाद मिळतो आहे.
- राजीव म्हसकर, प्राथमिक शिक्षणाधिकारी नाशिक
---
मराठी माध्यमाचे सर्वाधिक विद्यार्थी
स्वाध्याय सोडविणाऱ्यांमध्ये सर्वाधिक विद्यार्थी मराठी माध्यमाचे आहेत. शाळा बंद असताना या उपक्रमाच्या माध्यमातून मिळणाऱ्या प्रश्नांमधून एक प्रकारची चाचणी होत असून ऑनलाइन शिक्षण विद्यार्थ्यांना किती समजत आहे, हे स्वाध्यायमधून शिक्षकांच्या लक्षात येत आहे.