नाशिक : शाळा, महाविद्यालये बंद असल्याने मुलांचे पुन्हा ऑनलाइन शिक्षण सुरू झाले आहे. मुलांचे घराबाहेरचे बहुतांश खेळ यापूर्वीच बंद झालेले असल्याने मुले-मुली तासन्तास मोबाइलवर खेळत बसल्याचे दुष्परिणाम दिसू लागले आहेत. त्यामुळे मुला-मुलींच्या वर्षभरातील नियमित वजनवाढीपेक्षा अधिकची वजनवाढ, तसेच घरातच राहून सातत्याने फास्ट फूड खाण्याचे प्रमाण वाढल्याने स्थूलपणात वाढ झाल्याने अनेक जण मोटू झाल्याच्या तक्रारीही वाढल्या आहेत.
अनेक घरांतील मुले तर मोबाइल हातात असल्याशिवाय जेवणदेखील करीत नाहीत, इतके मोबाइलचे व्यसन लागले आहे, तसेच घराबाहेर खेळणे, मित्र, मैत्रिणींच्या गाठीभेटी कमी झाल्याने पायी चालणेदेखील जवळपास बंद झाले आहे. कोरोनापूर्वीच्या काळात अनेक घरांमध्ये मुलांना मोबाइलपासून लांब ठेवण्यात आले होते. किंवा फार तर काही वेळासाठीच मोबाइल हातात मिळत होता. त्यामुळे शाळा, क्लासेस, मैदानी खेळ त्यात मुलांना थोडेफार तरी शारीरिक श्रम, कष्ट पडत होते; पण ऑनलाइन शिक्षणामुळे मुले घरात बसून मोबाइल स्क्रीनच्या आणि टीव्हीच्या संपर्कात राहू लागल्याने केवळ बसून किंवा झोपून लोळत सर्व वस्तू हाताळण्याची पडलेली सवयच स्थूलपणा वाढविण्यास कारणीभूत ठरली आहे. शीतपेयांची सवय मुलांना असल्यास या कोरोना काळात शीतपेय पूर्णपणे वर्ज्य करावीत. मोबाइलचा वापर केवळ अभ्यासासाठी करताना अन्य वेळ मोबाइल हातात देणेच बंद केल्यासच मुले किमान घरात तरी खेळतील. तरच त्यांच्या वजनात घट येऊ शकेल.
कोट
मैदाने आणि अन्य क्रीडा संकुलदेखील बंद असल्याने नियमित खेळणाऱ्या मुला-मुलींनाही घरातच थांबण्याची वेळ आली आहे. त्यामुळे त्यांच्या फिटनेसमध्येदेखील घट झाली असून, घरीच थांबल्याने त्यांच्या वजनातही मोठी वाढ होऊ लागली आहे. मुला-मुलींच्या वजनातील वाढदेखील त्यांच्या खेळावर आणि वजनावर परिणाम करणारी ठरत आहेत.
- नीलेश आव्हाड, पालक
कोट
मुलांना झोपण्यासाठी, खेळण्यासाठी किमान सोसायटीत किंवा घरातील हॉलमध्ये कोणताही एखादा खेळ खेळण्यास प्रवृत्त करणे आवश्यक झाले. आहे, अन्यथा वर्षाला जिथे तीन-चार किलोची वजनवाढ अपेक्षित असताना जर तिथे आठ-दहा किलो किंवा त्यापेक्षाही अधिक वजनवाढ होऊ लागल्यास तो चिंतेचा विषय ठरू शकतो.
- डॉ. सुशील पारख, बालरोग तज्ज्ञ
कोट
आजच्या फास्ट फूडच्या जमान्यात उच्च उष्मांकयुक्त अन्न सेवन करण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे पौष्टिक घटक मिळत नाहीत; मात्र शरीरावर अतिरिक्त चरबीचे प्रमाण वाढू लागते. त्याचप्रमाणे कोरोना काळातील लहान मुलांची जीवनशैलीही लठ्ठपणासाठी कारणीभूत ठरत असल्याने त्यांच्या जीवनशैलीत आमूलाग्र बदल करण्याची गरज आहे.
- डॉ. सुयश नाईक, बालरोग तज्ज्ञ
इन्फो
वजन कमी करण्यासाठी ही घ्या काळजी
लठ्ठपणा टाळण्यासाठी सर्वप्रथम त्यांना मैदानावर खेळण्यास आणि नियमित व्यायाम करण्यासाठी पालकांनी प्रोत्साहन द्यायला हवे. दररोज सकाळी, संध्याकाळी घरातल्या घरात, गच्चीवर किंवा घराच्या, सोसायटीच्या अंगणात व्यायाम करणे निश्चितच लाभदायक ठरू शकते. तसेच फास्ट फूड खाण्यावर अधिकाधिक नियंत्रण आणले पाहिजे किंवा फास्ट फूड टाळावे.