नाशिक : शहर व जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची वाढती संख्या लक्षात घेता आरोग्य विभागाच्या वतीनेही नियंत्रण मिळविण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न केले जात असून, गेल्या चोवीस तासात जिल्ह्यात उपचार घेत असलेले ५७१ रुग्ण बरे होऊन घरी सोडण्यात आले आहेत. दरम्यान, बुधवारी जिल्ह्यात ६६८ संशयित रूग्ण सापडले असून, वीस जणांचा मृत्यू झाल्याचे रुग्णालय सूत्रांनी सांगितले.जिल्ह्यात दिवसभरात मृत्यू झालेल्यांमध्ये दहा रूग्ण नाशिक शहरातील असून, मालेगाव शहरातील दोन, ग्रामीण भागात आठ रूग्णांचा समावेश आहे.कोरोनाचा वाढता संसर्ग पाहता, आरोग्य विभागाने कोरोना रुग्णांबरोबरच त्यांच्या कॉन्ट्रॅक्टमध्ये आलेल्या संशयितांचा शोध घेवून त्यांचीही तपासणीही केली जात आहे. त्यामुळे बाधितांच्या संख्येत वाढ होत असल्याचे वैद्यकीय सूत्रांनी सांगितले.महापालिका क्षेत्रात ७६० संशयित रुग्ण दाखल करण्यात आले. ग्रामीण भागात ११८ रुग्ण नव्याने दाखल झाले आहेत. त्यातील समाधानाची बाब म्हणजे ५७१ रुग्णांना बरे वाटल्याने त्यांना घरी सोडण्यात आले आहे. आजवर विविध रुग्णालयात दाखल झालेल्या एकूण कोरोना बाधित रुग्णांपैकी ७५ टक्के रूग्ण औषधोपचाराने बरे झाले आहेत.रूग्ण बरे होण्याचे प्रमाण पाहता, आरोग्य विभागाला हायसे वाटले आहे. कोरोनाचे लक्षणे आढळल्यास नागरिकांनी तात्काळ नजिकच्या रूग्णालयात जावून तपासणी करावी, त्याच बरोबर सुरक्षित अंतर, मास्क, हातमोजे वापरावेत असे आवाहन करण्यात आले आहे.
दिवसभरात ५७१ कोरोना रुग्ण उपचाराअंती घरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 14, 2020 1:04 AM