त्र्यंबक विद्या मंदिर येथे पालकमंत्री भुजबळ यांच्याहस्ते माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त आयोजित ‘कृषिदिनी’ राज्यस्तरीय विविध कृषी पुरस्कार प्राप्त १४ शेतकऱ्यांचा, तसेच पीक स्पर्धा योजनेतील विजेत्या २५ शेतकऱ्यांचा सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला होता, त्यावेळी ते बोलत होते.
ते पुढे म्हणाले, महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक सर्वाधिक काळ राज्याचे मुख्यमंत्री होते. त्यांच्या कार्यकाळात दुष्काळी परिस्थितीत शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन शेतकऱ्यांना मार्गदर्शन करत त्यांनी संकरित बियाणे वापरण्यासाठी प्रोत्साहन दिले. त्यांच्या योगदानामुळे कृषी क्षेत्रात मोठी क्रांती झाली. त्यानंतर देशात खासदार शरद पवार यांनी त्यांच्या कार्याचा वसा घेऊन देशभरात कृषी क्रांती घडवून आणली. त्यातून देशाला अन्नधान्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण केले. त्यामुळे आज देश जगभरात अन्नधान्य निर्यात करत आहे.
खरीप हंगाम २०२१ यशस्वी करण्यासाठी व आधुनिक कृषी तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी कृषी विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या महत्त्वाच्या मोहिमांवर विशेष भर देऊन २१ जून ते १ जुलै २०२१ या कालावधीत कृषी संजीवनी मोहीम यशस्वीपणे राबविण्यात आली. त्याबद्दल पालकमंत्री छगन भुजबळ यांनी सर्वांचे कौतुक केले.
यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष बाळासाहेब क्षीरसागर म्हणाले की, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व जग थांबलं असताना शेती व्यवसाय थांबला नव्हता. सर्वांना अन्नधान्य उपलब्ध व्हावे यासाठी शेतकरी मात्र आपलं काम करत आहे. पुरस्कार प्राप्त शेतकऱ्यांनी आपल्या ज्ञानाचा उपयोग इतर शेतकऱ्यांसाठी करावा, त्यातून अधिक प्रगती साधता येईल, असेही त्यांनी यावेळी सांगितले.
यावेळी कृषी सभापती संजय बनकर यांनीही मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमास मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र शिंदे, कृषी अधिकारी रमेश शिंदे आदी उपस्थित होते.
चौकट===
कृषिमंत्री गैरहजर
राज्याचे कृषिमंत्रीपद नाशिक जिल्ह्याला मिळालेले असून, जिल्ह्यातील विविध शेतकऱ्यांनी राज्यस्तरीय पुरस्कार प्राप्त केले, तसेच पीक स्पर्धेतही २५ शेतकरी विजेते ठरलेले असताना, त्यांच्या सन्मानार्थ कृषिदिनी आयोजित कार्यक्रमास कृषिमंत्री दादा भुसे हे मात्र गैहजर राहिल्याबद्दल शेतकऱ्यांनी आश्चर्य व्यक्त केले आहे.
(फोटो ०१ कृषी)