सिन्नर : सिन्नर ऐतिहासिक व सांस्कृतिक यथादर्शन या ग्रंथाच्या निर्मितीत छायाचित्रकार व इतिहासाचे अभ्यासक दत्ता जोशी यांनी महत्वाचे योगदान दिल्याचे गौरवोद्गार संकलन समितीचे प्रेरक वा. रा. तथा आबा शिंगणे यांनी काढले.पुस्तकाच्या निर्मीतीतून सिन्नरच्या संपूर्ण इतिहासाचा मागोवा घेण्यात आला आहे. त्यात वर्तमानकाळातील संस्था व व्यक्तींच्या कार्यावरही माहिती देण्यात आली आहे. त्याचे प्रकाशन सार्वजनिक वाचनालयाच्या ग्रंथालय सप्ताहात अर्थतज्ञ्ज विनायक गोविलकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी दत्ता जोशी यांचा विशेष गौरव करण्यात आला. हे पुस्तक ज्यांच्या प्रेरणा व तळमळीतून साकारले ते इतिहासाचे अभ्यासक स्व. सुमंत गुजराथी यांना जोशी यांनी सावली सारखी सोबत केली होती. त्यांच्या निधनानंतरही जोशी यांनी इतिहास संकलन समितीस छायाचित्रे पुरविण्यापासून इतरही सहाय्य केले. त्या विषयीची कृतज्ञता वचनालयाकडूनही व्यक्त करण्यात आली. वाचनालयाचे संचालक सागर गुजराथी यांच्या हस्ते जोशी यांचा गौरव करण्यात आला. यावेळी डॉ. विनायक गोविलकर, कृष्णाजी भगत, पुंजाभाऊ सांगळे, हेमंत वाजे, वा. रा. शिंगणे, संपत पाटील आदि मान्यवर उपस्थित होते.
सिन्नरच्या इतिहास संकलनात योगदानाबद्दल दत्ता जोशी यांचा गौरव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 20, 2018 5:39 PM