नाशिक : चार वर्षापुर्वी भूमिपूजन करण्यात आलेल्या द्वारका ते नाशिकरोडच्या दत्तमंदिर चौकापर्यंतच्या उड्डाणपुलाचे काम करण्यावरून सार्वजनिक बांधकाम खाते व राष्टÑीय महामार्ग प्राधिकरण यांच्यात सुरू असलेला तिढा अखेर सुटला असून, दहा हजाराहून अधिक वाहने या रस्त्यावरून धावणार असल्याने उड्डाणपुलाचे काम राष्टÑीय महामार्ग प्राधिकरणामार्फतच करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे.शहरातील सारडा सर्कल, द्वारका ते नाशिकरोड या मार्गावरील वाहतुकीची होणारी कोंडी सोडविण्यासाठी सन २०१३ मध्ये द्वारका ते नाशिकरोड दरम्यान रस्त्याचे चौपदरीकरण व उड्डाणपुलाची निर्मिती करण्याचा निर्णय तत्कालीन आघाडी सरकारने घेवून सन २०१४ मध्ये त्याचे भूमीपुजनही करण्यात आले होते. त्यानंतर मात्र हा विषय बाजुला पडला. दरम्यान, खासदार हेमंत गोडसे यांनी केंद्र सरकारकडे पाठपुरावा केल्यामुळे सदरचे कामास शासनाने मंजुरी दिली. परंतु काम कोणी करावे यावरून सार्वजनिक बांधकाम खाते, राष्टÑीय महामार्ग प्राधिकरणात एकमत होत नसल्याने प्रश्न पुन्हा लटकला होता. द्वारका ते नाशिकरोड या रस्त्यावर वाहनांचे सर्व्हेक्षण करण्यात येवून कामाचा नकाशाही तयार करण्यात आला होता. या मार्गावरून दररोज दहा हजाराहून अधिक वाहनांची ये-जा सुरू असल्याने ज्या मार्गावरून दहा हजाराहून अधिक वाहने धावतील त्याचे काम राष्टÑीय महामार्ग प्राधिकरणाने करावे असा धोरणात्मक निर्णय केंद्र सरकारने घेतल्यामुळे आता द्वारका ते नाशिकरोड उड्डाणपुलाचे काम प्राधिकरणामार्फतच केले जाणार आहे. या कामासाठी भुसंपादन व बांधकामाचा खर्च जवळपास बाराशे कोटी रूपये इतका येणार आहे. या संदर्भात दिल्ली येथे केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्रालयात झालेल्या बैठकीत त्यावर शिक्कामोर्तब करण्यात आले. या प्रकल्पाचे तांत्रिक सल्लागार नवी मुंबईतील आकार अभिनव कन्सलन्टसी आहे. मंत्रालयात झालेल्या बैठकीस वाहतूक मंत्रालयाचे बी. एन. सिंग, विरेंद्र कौल, शंभु सिंग, संदीप चौधरी, संजय गर्ग, ए. श्रीवास्तव, राजेंद्र कुमार, राष्टÑीय महामार्गाचे आर. के. पांडे, आशिष शर्मा, अतुलकुमार आदी अधिकारी उपस्थित होते अशी माहिती खासदार हेमंत गोडसे यांनी दिली आहे.
द्वारका-नाशिकरोड उड्डाणपुलाच्या कामाचा तिढा सुटला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 20, 2018 2:58 PM
शहरातील सारडा सर्कल, द्वारका ते नाशिकरोड या मार्गावरील वाहतुकीची होणारी कोंडी सोडविण्यासाठी सन २०१३ मध्ये द्वारका ते नाशिकरोड दरम्यान रस्त्याचे चौपदरीकरण व उड्डाणपुलाची निर्मिती करण्याचा निर्णय तत्कालीन आघाडी सरकारने घेवून सन २०१४ मध्ये त्याचे भूमीपुजनही करण्यात आले
ठळक मुद्देमहामार्ग प्राधिकरण करणार काम :चार वर्षापासून रखडला प्रश्नबांधकामाचा खर्च जवळपास बाराशे कोटी रूपये इतका येणार