पडक्या इमारती बनला मद्यपींचा अड्डा
नाशिक : शहर परिसरातील विविध भागांत असलेल्या अनेक शासकीय इमारती, अर्धवट अवस्थेतील इमारतींचा ताबा मद्यपींनी घेतला आहे. सायंकाळपासूनच येथे मद्यपींचा वावर असून, रात्री अंधाराचा फायदा घेत येथे अनेक मद्यपींचा येथे धिंगाणा सुरू असतो. या पडक्या, जुन्या इमारतींच्या आत अंधार असल्यामुळे अंधाराचा फायदा घेत, मद्यपी त्या इमारतींमध्ये त्यांचा अड्डा बनवित असल्याने परिसरातील नागरिक त्रस्त झाले आहेत.
गंजमाळ चौकातील सिग्नलकडे दुर्लक्ष करण्याचे प्रकार
नाशिक : त्र्यंबक नाकाकडून भद्रकालीकडे जाणारे अनेक दुचाकीस्वार गंजमाळ येथील सिग्नलवर न थांबता नियमांचे उल्लंघन करण्याचे प्रकार नित्याचेच झाले आहेत. शहरातील हा महत्त्वाचा सिग्नल असून, त्यावर सातत्याने वर्दळ सुरू असते. अशावेळी अनेक दुचाकीस्वार, रिक्षाचालक सिग्नलकडे दुर्लक्ष करीत असल्याने वादावादीचे प्रसंग ओढवतात. त्यामुळे या चौकात कायमस्वरूपी वाहतूक पोलीस ठेवण्याची मागणी नागरिक करीत आहेत.
जुने नाशिकच्या अंतर्गत रस्त्यांची दुरवस्था
नाशिक : शहरातील जुने नाशिक भागातील अंतर्गत रस्त्यांची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली आहे. या रस्त्यांवर ठिकठिकाणी खड्डे पडले असून, वाहन चालकांना समस्यांचा सामना करावा लागत आहे. महापालिकेने या भागातील रस्त्यांची दुरुस्ती करावी, अशी मागणी जुने नाशिक परिसरातील नागरिकांनी केली आहे.
मुंबई नाक्याला हवेत पूर्णवेळ पोलीस
नाशिक : शहरातून मुंबई नाक्याचा चौक ओलांडताना दिवसभर मोठ्या प्रमाणात वाहतूककाेंडी होते. अनेक वेळा या ठिकाणी वाहतूक पोलीस नसतात. कोंडीमुळे अनेक वेळा वाहन चालकांमध्ये हमरीतुमरीचे प्रकार घडतात. या ठिकाणी कायमस्वरूपी वाहतूक पोलिसांची नियुक्ती करावी, अशी मागणी वाहन चालकांकडून सातत्याने होत असते.
सारडा सर्कलला रस्त्यावर अतिक्रमण
नाशिक : सारडा सर्कलला रस्त्यावर किरकोळ विक्रेत्यांचे मोठ्या प्रमाणात अतिक्रमण वाढले आहे. गत तीन महिन्यांपासून सर्व दुकाने, फळविक्रेते, पदपथ विक्रेत्यांनी आणि किरकोळ विक्रेत्यांनी अतिक्रमण करून रस्ता अडविण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे या अतिक्रमणधारकांवर तातडीने कारवाई करण्याची मागणी होत आहे.