नाशिक : द्वारका सर्कलवरील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी पोलिसांचा ‘यू-टर्न’चा प्रयोग सपशेल अपयशी ठरल्यानंतर सोमवारी (दि.२३) नाशिक सिटी मोबॅलिटी सेलच्या बैठकीत विविध पर्यायांवर चर्चा करण्यात आली. त्यात प्रामुख्याने, द्वारका सर्कलवरील सिग्नल यंत्रणा अधिक प्रभावी करण्यासाठी वाहतूक बेट हटविण्याचा विचार पुढे आला असून, त्याबाबत राष्टÑीय महामार्ग प्राधिकरणशी चर्चा करून पडताळणी करण्याचे निश्चित करण्यात आले. महापालिका आयुक्त अभिषेक कृष्ण यांच्या अध्यक्षतेखाली मोबॅलिटी सेलची बैठक झाली. यावेळी, वाहतूक शाखेच्या प्रतिनिधींनी काही दिवसांपूर्वी द्वारका सर्कलवर राबविलेल्या ‘यू- टर्न’च्या योजनेत आलेल्या अडचणी कथन केल्या व काही निरीक्षणे बैठकीत नोंदवली. वाहतूक शाखेच्या निरीक्षणानुसार, पुण्याहून येणाºया अवजड वाहनांना मारुती मंदिराजवळ डावे वळण घेताना अडचणी आल्या. जोपर्यंत डाव्या वळणाच्या ठिकाणी असलेले अतिक्रमण हटत नाही तोपर्यंत वाहतूक कोंडी फुटू शकत नसल्याचे सांगण्यात आले. यावेळी आयुक्तांनी न्यायप्रविष्ट बाब लक्षात घेऊन कायदेशीर सल्ल्यानंतर परिसरातील अतिक्रमण हटविण्याबाबत आश्वासित केले. याचबरोबर सर्कलवरील भुयारी मार्गाचे स्टेअर केस स्थलांतरित करण्याची सूचना वाहतूक शाखेने केली शिवाय, सर्कलवरील वाहतूक बेट हटविल्यास सिग्नल यंत्रणा अधिक प्रभावी होऊ शकते, असेही निरीक्षण नोंदविले. याबाबत राष्टÑीय महामार्ग प्राधिकरणच्या अधिकाºयांशी चर्चा करून त्याची पडताळणी करण्याचे ठरविण्यात आले. शहरातील ट्रॅफिक सिग्नलबाबतही चर्चा झाली. सद्यस्थितीत ३२ ट्रॅफिक सिग्नल आहेत. त्यामुळे आणखी कुठे तत्काळ आवश्यकता आहे, अशा चौकांची यादी तयार करण्याची सूचना करण्यात आली. गतिरोधकांबाबतही उच्च न्यायालयाने २००५ मध्ये दिलेल्या निर्देशांचे अवलोकन करूनच निर्णय घेण्याचे ठरविण्यात आले. दरम्यान, पुढील बैठक दि. २४ नोव्हेंबरला घेण्यात येणार असून, त्यात स्मार्ट सिटी अतंर्गत ट्रॅफिक व ट्रान्सपोर्टशी संबंधित प्रकल्पांवर चर्चा करण्याचा निर्णय घेण्यात आला. बैठकीला, नाशिक फर्स्टचे अभय कुलकर्णी, देवेंद्र बापट, प्रमोद लाड, आयटीडीपी संस्थेचे हर्षद अभ्यंकर, राष्टÑीय महामार्ग प्राधिकरण विभाग क्रमांक ९चे अभियंता, अर्बन मास ट्रॅफिक संस्थेचे महेशकुमार, अमित भंडारी, न्हाईचे मनोज पाटील, महापालिकेचे शहर अभियंता उत्तम पवार आदी उपस्थित होते.वाहतूक आराखडा महिनाभरातमहापालिकेने शहरातील वाहतूक आराखड्यासंदर्भात अर्बन मास ट्रॅफिक संस्थेमार्फत सर्वेक्षण पूर्ण केले आहे. सदर संस्थेने तयार केलेल्या वाहतूक आराखड्यावर सूचना व हरकती मागविण्यात आल्या होत्या. त्या सूचना व हरकतींचा अंतर्भाव करून अंतिम आराखडा महिनाभरात सादर करण्याच्या सूचना आयुक्तांनी दिल्या.
द्वारकावरील वाहतूक बेट हटविणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 24, 2017 12:13 AM