नाशिक (सुयोग जोशी) : शहरात प्रदुषणाला आळा घालावा म्हणून केंद्र शासनाच्या एन कॅप निधीअंतर्गत १४ कोटी रूपये खर्च करून महापालिका आता सबस्टेशन उभारणार असून लवकर ई बसेस धावू लागणार आहेत. केंद्र सरकार बससेवा सुरु झाल्यानंतर पुढील दहा वर्षासाठी एका बससाठी प्रतिकिलोमीटर २४ रुपये अनुदान मिळणार आहे. केंद्र सरकार 'स्वच्छ हवा' कार्यक्रमाअंतर्गत वायू प्रदूषण कमी करण्यासाठी महापालिकांना दरवर्षी कोट्यवधीचा निधी देत आहे. त्या अंतर्गत नाशिक मनपाला मागील चार वर्षात ऐंशी कोटी निधी प्राप्त झाला आहे. या निधीचा वापर मनपा इलेक्ट्रिक बस खरेदीसाठी करणार होती. परंतु काही कारणास्तव त्यावर पाणी फिरले. आता केंद्राच्या पीएमई बस योजनेअंतर्गत नाशिक मनपाला पन्नास इलेक्ट्रिक बसेस मिळणार आहे. त्यासाठी मनपा एन कॅप निधीतून आडगाव ट्रक टर्मिनल येथे बसेससाठी इलेक्ट्रिक बस डेपो उभारणार आहे. केद्रांचा पथकाने या डेपोची पाहणी केली आहे. इलेक्ट्रिक बसेस चार्जिंगसाठी महावितरणचे सबस्टेशन उभारावे लागणार आहे. त्यासाठी मनपाने महावितरणकडे कोटेशन मागितले होते. त्यानुसार बस डेपो परिसरात वीज उपकेंद्र उभारणीसाठी चौदा कोटी खर्च येईल. महावितरणला कार्यारंभ आदेशमनपाने लवकरच त्यासाठी महावितरणला कार्यारंभ आदेश देणार आहे. या ठिकाणी चार्जिग स्टेशन पाॅइट उभारणे, तिथ पर्यंत केबल टाकणे याचा देखील समावेश आहे. महापालिकेकडून सिटिलिंक बससेवा सुरु असून त्यासाठी ठेकेदार मनपाने नेमला आहे. पण, पन्नास ई बसेससाठी केंद्र सरकार एजन्सी नेमेल व त्याच्याकडून शहरात बससेवा कार्यन्वित केली जाईल. सबस्टेशन उभारण्याबरोबरच दर महिन्याचे चार्जिंगचे बील हे एजन्सीकडून दिले जाणार आहे.
नाशकात लवकरच धावणार ई बसेस
By suyog.joshi | Published: February 12, 2024 8:49 PM