नाशिक : जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून महिलांना त्यांच्यामधील स्त्रीत्वाचे साजरीकरण करण्यासाठी खुले व्यासपीठ मिळावे हा उद्देश ठेवून ८ मार्च रोजी ‘वुमन्स वंडरफुल वर्ल्ड’ या आगळ्या-वेगळ्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती ‘इ अॅॅन्ड जी’च्या संचालक अश्विनी धुपे यांनी पत्रकार परिषदेत दिली. हा कार्यक्रम महिलादिनी हॉटेल एक्स्प्रेस इनच्या रॉयल हॉल येथे २.३० ते ६.३० यावेळेत होणार असून, सर्व स्तरातील महिलांना यात मोफत प्रवेश असणार आहे. या महोत्सवात नृत्य, एकांकिका, आहार, स्त्रीयांचे रोग, व्यायाम, यशस्वी उद्योग व्यवसाय करणाऱ्या महिलांचे अनुभव आदि विविध विषयांवर व्याख्याने आदि कार्यक्रम होणार आहे. कार्यक्रमास सहभागी महिलांमधून उत्तम सादरीकरण, उत्तम वेशभूषा आदिंसाठी पारितोषिकेही दिली जाणार आहे. ‘फॅशन शो’ने कार्यक्रमाची सांगता केली जाणार आहे. यावेळी उत्कृष्ट उद्योजिकांचा विशेष सत्कार करण्यात येणार आहे. सहभागी महिलांनाही उत्स्फूर्तपणे नृत्य, नाट्य, गायन आदि त्यांच्यातील कलांचे सादरीकरण करण्याची संधी मिळणार असल्याचेही यावेळी सांगण्यात आले. या आगळ्या-वेगळ्या कार्यक्रमात मोठ्या संख्येने महिलांनी सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे. पत्रकार परिषदेस चेतना करवा, डॉ. वर्षा पवार आदि उपस्थित होते. (प्रतिनिधी)
‘इ अॅन्ड जी’तर्फे महिलादिनी विशेष कार्यक्रम
By admin | Published: March 05, 2016 10:19 PM