नरेंद्र दंडगव्हाळ नाशिकमहापालिकेच्या शिक्षण मंडळाच्या वतीने सुमारे तीन ते चार कोटी रुपये खर्च करून शहरातील मनपाच्या प्रत्येक शाळांमध्ये सुरू केलेल्या ई-लर्निंगच्या अभ्यासक्रमातील इयत्ता पहिली ते पाचवीचा अभ्यासक्रम हा दोन वर्षांपूर्वीच बदल झालेला आहे. त्यानुरूप नवा अभ्यासक्रम समाविष्ट न केल्याने ई लर्निंग पूर्णत: बंद आहे.मनपाच्या शिक्षण मंडळाच्या वतीने लाखो रुपये खर्च करून प्राथमिक व माध्यमिक शाळेतील विद्यार्थ्यांना ई-लर्निंगच्या सहाय्याने शिक्षण देण्याची सोय केली आहे. ई-लर्निंग म्हणजे संगणकाद्वारे अतिशय सोप्या व व्यवस्थितरीत्या समजेल अशा भाषेत अभ्यासक्रम समजावून सांगण्याची यात व्यवस्था असल्याचा दावा केला जातो. यात विषेश करून इयत्ता पहिली ते पाचवीच्या विद्यार्थ्यांना चित्रफितीद्वारे शिक्षण देण्यात येत असल्याने विद्यार्थ्यांना लवकर समजते. त्यानुसार महापालिकेच्या प्रत्येक शाळेतील एका स्वतंत्र खोलीमध्ये ई-लर्निंगची व्यवस्था करण्यात आलेली आहे. या ठिकाणी प्रत्येक वर्गातील शिक्षक विद्यार्थ्यांना दिवसातून किमान एक तास हा अभ्यासक्रम शिकवित असल्याचे शिक्षकांकडून सांगण्यात येते, परंतु याबाबत सिडकोतील शाळांमध्ये प्रत्यक्ष पाहणी केली असता बहुतांशी ९९ टक्के शाळांमधील ई-लर्निंग केंद्र कुलूप बंद अवस्थेतच असल्याचे दिसून आले आहे, तर काहींनी फक्त नावापुरतेच ई- लर्निंग केंद्र असल्याचे चित्र बघावयास मिळत आहे. काही शाळांमध्ये तर शाळेतील एखाद्या शिक्षकालाच याची माहिती असल्याने इतर शिक्षकांना ते सुरू क रणेदेखील यात नसल्याचे समजते.सिडकोतील मनपाच्या शाळांमध्ये पाहणी केली असता इयत्ता पहिली ते पाचवीचा अभ्यासक्रम हा गेल्या वर्षभरापासून बदललेला असतानाही पूर्वीचे आहे तोच अभ्यासक्रम दिसून येत आहे. विषेश म्हणजे शाळांमधील शिक्षकांनाही याची संपूर्ण माहिती असताना त्यांनीही याकडे गांभीर्याने बघितले नसल्याचे दिसून येत आहे. लाखो रुपये खर्च करून सुरू केलेल्या ई-लर्निंग अभ्यासक्रमातील इयत्ता पहिली ते पाचवीचा अभ्यासक्रम गेल्या वर्षभरापासून बदललेला असतानाही शिक्षण मंडळास माहिती नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
पालिका शाळांमध्ये ‘ई-लर्निंग’ बंद
By admin | Published: January 02, 2016 11:48 PM