नाशिक : मालमत्ता खरेदीनंतर त्यांची नोंदणी करणे सुलभ व्हावे यासाठी आता नाशकातील ग्राहकांना दुय्यम निबंधक कार्यालयात जाण्याची गरज उरणार नाही. कारण मुंबई-पुण्यानंतर नाशकातही खरेदी- विक्री व्यवहारांची दस्तनोंदणी प्रक्रिया आता ऑनलाइन होणार असून, बिल्डरच्या कार्यालयातच व्यवहारांची दस्तनोंदणी करता येणार आहे.
ऑनलाइन दस्तनोंदणीसंदर्भात नोंदणी महानिरीक्षक व मुद्रांक नियंत्रक पुणे, सहजिल्हा निबंधक व मुद्रांक जिल्हाधिकारी नाशिक तसेच क्रेडाई नाशिक मेट्रो यांच्यातर्फे गुरुवारी (दि.२) संयुक्तरीत्या प्रशिक्षण कार्यशाळा घेण्यात आली. मुंबई व पुणे या महानगरानंतर ई-नोंदणी सेवा उपलब्ध होणारे नाशिक हे राज्यातील तिसरे शहर ठरले असून, नोंदणी प्रक्रियेमध्ये होणाऱ्या निरंतर सुधारणांचा हा महत्त्वाचा भाग आहे. यापूर्वी प्रक्रिया पूर्णपणे मनुष्यबळाच्या मदतीने करण्यात येत होती. त्यानंतर याप्रक्रियेचे पूर्णपणे संगणकीकरण करण्यात आले असून, गुरुवारी सुरू करण्यात आलेली ई-रजिस्ट्रेशन सेवा या नोंदणी प्रक्रियेतील महत्त्वाचा टप्पा ठरणार आहे. त्यामुळे ग्राहकांना नोंदणीसाठी ताटकळत राहण्याची गरज उरणार नाही. मात्र ही सेवा देण्यासाठी ५०हून अधिक सदनिका, भूखंड, दुकाने अथवा कार्यालये असलेल्या बांधकाम व्यावसायिकांनाच उपलब्ध करून देता येणार आहे. त्यासाठी राज्य शासनाकडे नोंदणी करणे आवश्यक आहे. नोंदणीकृत प्रकल्पातील ग्राहकांना या सुविधेचा लाभ घेता येणार असल्याचे ई-नोंदणी समन्वयक मनीष जाधव यांनी बांधकाम व्यावसायिकांना ई-नोंदणीसंदर्भात मार्गदर्शन करणात स्पष्ट केले. यावेळी क्रेडाई महाराष्ट्राचे सचिव सुनील कोतवाल, क्रेडाईचे मानद सचिव गौरव ठक्कर, कार्यशाळेचे समन्वयक अतुल शिंदे, अनिल आहेर, सागर शहा तसेच क्रेडाई मॅनेजिंग कमिटी सदस्य उपस्थित होते. नरेंद्र कुलकर्णी यांनी उपस्थितांचे आभार मानले.
--
महाराष्ट्र शासनाची ई-रजिस्ट्रेशन सुविधा नाशिकमध्ये सुरू झाली आहे. त्यामुळे बांधकाम व्यावसायिक मालमत्तेची विक्री पश्चात नोंदणी त्याच्याच कार्यालयात करू शकतो. या सुविधेमुळे ग्राहकांना लाभ होणार असून, व्यवहारांमध्ये अधिक पारदर्शकता येऊन गैरव्यवहारदेखील टाळता येणे शक्य होणार आहेत.
- कैलास दवंगे, मुद्रांक जिल्हाधिकारी
--
दिवसेंदिवस शहर विस्तारत असताना नवनवीन प्रकल्पात नोंदणी करण्यासाठी वाढीव पायाभूत सोयी -सुविधांची गरज ई-नोंदणी प्रक्रियेमुळे पूर्ण होणार आहे. तसेच ग्राहकांना आता कोणत्याही दिवशी म्हणजे अगदी सुटीच्या दिवशीही कोणत्याही वेळी नोंदणी करणे शक्य होणार आहे.
-रवि महाजन, अध्यक्ष, क्रेडाई नाशिक मेट्रो