लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : हिरकणी या महिलांच्या संस्थेने नाशिक शहरात महिलांनी महिलांसाठी चालणारी ई-रिक्षा ही संकल्पना सुरू केली असून, एका सोहळ्यात गुलाबी रिक्षांची ओळख नाशिककरांना करवून देण्यात आली. यावेळी झालेल्या फॅशन शो मध्ये चालक भगिनींनी केलेले रॅम्पवॉकही लक्षवेधी ठरले.गंगापूररोडवरील वृंदावन लॉन्स येथे या सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाची सुरुवात गणेश वंदनेने झाली. हिरकणी ग्रुपच्या सदस्या आणि प्रमुख परीक्षकांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. यावेळी झालेल्या फॅशन शो मध्ये विविध मॉडेल्सबरोबर दहा रिक्षाचालक महिलांनीदेखील रॅम्पवॉक केले. मीनल विश्वंभर यांनी यावेळी मनोगत व्यक्त केले. ई-रिक्षाचे उद्घाटन महिंद्र अॅन्ड महिंद्रा कंपनीच्या डेप्युटी मॅनेजर रुपाली फुले व हिरकणीच्या अध्यक्षा रोहिणी नायडू यांच्या हस्ते झाले. या मोहिमेसाठी २५ रिक्षा घेण्यात आल्या आहेत. रिक्षाचालक महिलांना प्रशिक्षण, स्वसंरक्षणाचे धडे देण्यात आले असून, रिक्षाचे हुड हे गुलाबी रंगाचे आहे. चालक महिलादेखील गुलाबी अॅप्रण परिधान करून चालकाची भूमिका बजावणार आहेत.दरम्यान, यावेळी झालेल्या सौंदर्य स्पर्धेत मोना बोरसे (पॉप्युलर वेस्ट इंडिया २०१८), स्मृती पांचाल (मिसेस युनिव्हर्स २०१८), आशा लुथरा (फॅशन डिझायनर) या परीक्षक म्हणून उपस्थित होत्या. या स्पर्धेमध्ये एकूण १८ मिस आणि १८ मिसेस तसेच १६ डिझायनर स्पर्धक सहभागी झाले होते. तीन राउंडमध्ये एक मिस, एक मिसेस आणि एक फॅशन डिझायनर यांना बक्षिसे देण्यात आली.स्पर्धेत मिस हिरकणी ठरल्या अपूर्वा रहाळकर, मिसेस हिरकणी प्रीती पगारे, मिसेस हिरकणी डिझायनर रिना भावसार, मिसेस हिरकणी डिझायनर अनुश्री. तर विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते पारितोषिके देण्यात आली. शलाका यांनी सूत्रसंचालन केले.