नाशिक- शहरात कोरोनाबाधितांची वाढती संख्या आणि त्यातही गंभीर रुग्णांना खासगी रुग्णालयात पैसे भरूनही ऑक्सिजन मिळणे दुरापास्त झाल्याने अखेर नाशिक महापालिकेच्या वतीने १ हजार २५० ऑक्सिजन कॉन्सनट्रेटर खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी प्रत्येक नगरसेवकाचा निधी वापरण्यात येणार असल्याने एका प्रभागात चाळीस ऑक्सिजन कॉन्सनट्रेटर उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे वृत्त आहे.
शहरात कोरोनाबाधितांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत असून अशावेळी महापालिकेच्या आणि खासगी रुग्णालयात ऑक्सिजन बेडस उपलब्ध होणे कठीण झाले आहे. नवीन ऑक्सिजन बेडससाठी महपालिकेने नवीन बिटको आणि डॉ. झाकीर हुसेन रुग्णालयात बेडसच्या उपलब्धतेसाठी ऑक्सिजन टाक्या बसवल्या असल्यातरी त्यादेखील कमी पडत आहेत. खासगी रुग्णालयात नंबर लावण्यासाठी वेटींग असते. अशावेळी रुग्णाला किमान गरजेच्या वेळी प्राणवायू मिळावा यासाठी ऑक्सिजन कॉन्सनट्रेटर उपयुक्त ठरत असल्याने आता तातडीची बाब म्हणून आयुक्त कैलास जाधव यांनी ऑक्सिजन कॉन्सनट्रेटर खरेदी करण्याचे ठरविले आहे. त्यासाठी नगरसेवकांचाही सकारात्मक प्रतिसाद मिळाला आहे.
हवेतील प्राणवायू रुग्णांना पुरविणारे ऑक्सिजन कॉन्सनट्रेटर सध्या अत्यंत उपयुक्त ठरत असल्याने महापालिकेने यापूर्वीच दोन टप्प्यात दोनशे ऑक्सिजन कॉन्सनट्रेटर खरेदी केले आहेत. परंतु, ते कमी पडण्याची शक्यता गृहीत धरून प्रत्येक नगरसेवकाच्या निधीतून प्रत्येकी १० याप्रमाणे १२५ नगरसेवकांच्या निधीतून १२५० ‘ऑक्सिजन कॉन्सनट्रेटर’ घेण्यात येणार असून त्यासाठी किमान चाळीस कोटी रुपयांचा खर्च येणार आहे.
इन्फो....
बोरस्ते यांची ऑक्सिजन बँक
रुग्णांची गरज लक्षात घेता ऑक्सिजन कॉन्सनट्रेटरची मागणी वाढत आहे. त्यामुळे महापालिकेतील विरोधी पक्षनेते अजय बोरस्ते यांनी बालगणेश फाऊंडेशनतर्फे ऑक्सिजन बँक सुरू केली आहे. एकूण तीस ऑक्सिजन कॉन्सनट्रेटर त्यांनी उपलब्ध करून दिले असून गरजवंत रुग्णांना त्यांनी ते उपलब्ध करून दिले आहे.
इन्फो... आमदार फरांदे- हिरे यांचाही पुढाकार
कोरोनाबाधित गंभीर रुग्णांना ऑक्सिजन बेडस मिळत नसल्याने आता आमदारांनीदेखील ऑक्सिजन कॉन्सनट्रेटर उपलब्ध करून देण्यासाठी पुढाकार घेतला आहे. सीमा हिरे यांनी आमदार निधीतून १५० ऑक्सिजन कॉन्सनट्रेटर खरेदी करण्यासाठी पुढाकार घेतला आहे. तर नाशिक मध्यच्या आ. प्रा. देवयानी फरांदे यांनी १५ लाखांचा निधी उपलब्ध करून दिला आहे. यासंदर्भातील पत्र हिरे आणि फरांदे यांनी जिल्हा नियोजन समितीला दिले आहे.