कळवण/पांडाणे : कळवण तालुक्यातील बिलवाडी, देवळीवणी, जामलेवणी, बोरदैवतसह दिंडोरी तालुक्यातील पांडाणे परिसरात रविवारी दुपारी भूकंपाचे सौम्य धक्के बसले. कळवण तालुक्यात दोन तासात भूकंपाचे सहा धक्के जाणवल्याचे सूत्रांनी सांगितले.पांडाणे येथील भूकंपाची ३.१ रिश्टर स्केल इतकी नोंद नाशिक येथील मेरी केंद्रात झाली आहे. दरम्यान, नागरिकांनी घाबरून न जाण्याचे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.रविवारी (दि.२७) दुपारी दीड वाजेच्या सुमारास तसेच सायंकाळी ६ वाजून सात मिनिटांच्या सुमारास पांडाणे परिसरात ३.१ रिश्टर स्केल भूकंपाचे धक्के बसल्याची माहिती सूत्रांनी दिली.कळवण तालुक्यातील बिलवाडी, देवळीवणी, जामलेवणी, बोरदैवत, येथे भूकंपाचे सौम्य धक्के बसल्याने घरातील भांडे पडणे, विजेच्या तारा, पोल हलणे अशा स्वरूपाचे धक्के जाणवू लागल्याने नागरिकांमध्ये काही काळ भीतीचे वातावरण आहे.
कळवण, पांडाणे परिसरात भूकंपाचे धक्के
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 28, 2019 1:27 AM