बेलगाव कुऱ्हे : इगतपुरी तालुक्याच्या पूर्व भागात मुसळधार पावसाने हाहाकार माजवला अन् अनेक गावे पुराच्या पाण्यात वेढली गेली. पुराच्या तडाख्यात सापडलेले नागरिक सुखरूप आहेत; मात्र पावसाच्या थैमानाने काही शेतकऱ्यांनी लागवड केलेली भातपिके डोळ्यादेखत वाहून गेली, अनेकांचे संसार उद्ध्वस्त झाले, तर काही शेतकऱ्यांनी साठवून ठेवलेले कांदेदेखील अतिवृष्टीच्या पुरात गडप झाले. पावसाने शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाल्याने आता ते हवालदिल झाले आहेत. साकुर परिसरात अतिवृष्टीमुळे भाताचे तसेच भाजीपाला पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. तसेच येथील सरपंच विष्णुपंत सहाणे यांच्या शेतातील जवळपास एक एकर ऊस जमीन अक्षरश: धुवून गेली आहे. नवीन लागवड केलेल्या एक एकर टमाटा पिकांचे मल्चिंग व ड्रिप पूर्ण पुरात वाहून गेले. जवळपास दोन लाख रु पयांचे नुकसान झाले आहे. येथील बऱ्हे यांच्या घरात पाणी शिरून घराची पडझड झाली आहे. घरातील सर्व धान्य व सामानाची मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. सर्वच शेतकऱ्यांचे बांध, पिके, घरांची पडझड झालेली आहे.अस्वली स्टेशनजवळील गोहाड मळ्यातील शेतकरी बाजीराव गोहाड यांनी गोठ्यात साठवून ठेवलेले जनावरांसाठी गवत पडवीसहित काल ओंडओहोळ नदीच्या पुरात वाहून गेले व भातपिकाचेदेखील नुकसान झाले. सुदाम काजळे यांच्या शेताचे बांध फुटून भाताच्या रोपांचे नुकसान झाले.साकुरफाटा भागातील पिंपळगाव डुकरा येथील शेतपिकांचे व चाऱ्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. सर्वच पिकांची झालेले नुकसान शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी आणणारे आहे. बाधित शेतकऱ्यांना कोसळलेली मने सावरणे आता कठीण झाले आहे. शेतकऱ्यांनी खरीप कर्ज काढून शेती पिकवली; मात्र निसर्गाच्या अवकृपेने त्यांच्या पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. नुकसानीमुळे त्यांना कर्जफेड करणे कठीण आहे. पर्यायाने कर्ज देणाऱ्या संस्थाही अडचणीत येण्याची शक्यता आहे. बाधितांचे अश्रू पुसण्याबरोबरच शासनाकडून मदत मिळवून देण्यास राजकीय पदाधिकाऱ्यांनी प्राधान्य देण्याची अपेक्षा परिसरातील शेतकऱ्यांनी व्यक्त केली. (वार्ताहर)
इगतपुरीच्या पूर्व भागात अतिवृष्टीने शेती, घरांचे प्रचंड नुकसान
By admin | Published: August 04, 2016 12:34 AM