निफाड : तालुक्याच्या पूर्वभागातील धारणगाव (वीर )धारणगाव (खडक), नांदगाव, धानोरे परिसराला बुधवारी मुसळधार पावसाने चांगलेच झोडपले. पावसामुळे परिसरातील शेतांमध्ये व गावातील सखल भागातही मोठ्या प्रमाणात पाणी साचले होते. दोन-तीन दिवसांपासून वातावरणात प्रचंड उष्मा जाणवत असताना बुधवारी दुपारी अडीच वाजेच्या सुमारास बोकडदरे, धामणगाव(वीर), धारणगाव (खडक), धानोरे नांदगाव पट्ट्यात मुसळधार पावसाने झोडपले. या पावसामुळे काही काळ रस्त्यावरील वाहतूकही खोळंबली होती. लोणजाई डोंगर माथ्यापासून पावसाचे वेगाने येणारे पाणी नाल्यांमधून ओसांडून वाहत असल्याने परिसरातील बहुतांश बंधारे भरले असून, शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे. पावसाने दडी दिल्याने परिसरातील सोयाबीन पीक जळून गेले होते, तर धारणगाव (वीर ) येथे टँकरने पाणीपुरवठा सुरू होता. झालेल्या पावसामुळे येथील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटण्यास मदत झाली असून, आगामी कांदा व इतर पिकांसाठीही हा पाऊस लाभदायक ठरणार आहे. (वार्ताहर)
निफाडच्या पूर्वपट्ट्याला पावसाने झोडपले
By admin | Published: September 16, 2015 11:07 PM