नाशिक- फास्ट फूड म्हणा किंवा चवीतील बदल म्हणा, सध्या लहानांपासून मोठ्यांपर्यंत चायनीज पदार्थांची भुरळ पडली आहे. घरात रेडी टू ईट आणून किंवा घरीच भारतीय पद्धतीने पदार्थ बनवले जातात. परंतु रस्त्यावरील हातगाडी किंवा हॉटेलात गेल्यानंतर देखील हमखास चायनीज पदार्थ ऑर्डर केले जातात. मात्र, अशा प्रकारचे पचनाला जड असलेले हे पदार्थ पोटाबरोबरच वेगवेगळ्या आजारांंना निमंत्रण देखील देऊ शकतात. नुडल्स, सूप, चायनीज भेळ असे पदार्थ सर्रास ऑर्डर केले जातात. मात्र, अलीकडे खास चायनीज पदार्थांची हॉटेल्स असतातच. परंतु रस्त्याच्या कडेला असलेल्या हातगाड्यांवरील लालभडक रंगाचे नुडल्स किंवा अन्य पदार्थांकडेही अनेकांचे लक्ष वेधले जाते. मात्र, अशा प्रकारचे पदार्थ खाताना जरा जपून, त्यामुळे आरोग्यावर प्रतिकूल परिणाम हाेऊ शकतो. मुळात अस्सल चायनीज पदार्थ आणि भारतीय पद्धतीने मसाले, तेल वापरून तयार केलेेले पदार्थ यात मोठी तफावत असते. भारतीय पद्धतीने केलेल्या चायनीज पदार्थांमध्ये सोडियमचे प्रमाण जास्त असते. त्यामुळे असे पदार्थ पचायला जड असतात. त्यामुळे पोटाला त्रास हाेऊ शकतो, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.
इन्फो...
काय आहे अजिनोमोटो?
चायनीज पदार्थांमध्ये प्रामुख्याने अजिनोमोटो असतो म्हणजेच त्याला एमएसजी म्हणजे मोनोसोडियम ग्लुटामेट म्हटले जाते. तसे चायनीज पॅकिंगवर लिहिलेले असते. चव-फ्लेवरसाठी त्याचा उपयोग केला जातो. एफडीएची त्याला मान्यता आहे. मात्र, अजिनोमोटोचे अतिसेवन प्रकृतीला त्रासदायक ठरू शकते.
इन्फो..
म्हणून चायनीज खाणे टाळा..
आहारतज्ज्ञ रंजिता शर्मा यांनी दिलेल्या माहितीनुसार अतिअजिनोमाेटो असलेल्या पदार्थांमुळे पोटाचे विकार होतात. परंतु त्याचबराेबर हृदयविकार, रक्तदाब असे विकार होऊ शकतात. तसेच यकृतावर देखील परिणाम होऊ शकतो.
कोट...
सोडियमचे प्रमाण जास्त असल्याने चायनीज पदार्थांमुळे रक्तदाब लहान-मोठ्यांमध्ये वाढू शकतो. तसेच लहान मुलांमध्येही स्थूलता वाढते आणि सारखी तहान लागल्यासारखे होते. आळस आल्यासारखे वाटते, अनेक जण अशा तक्रारी घेऊन डाॅक्टरांकडे येत असतात. त्यामुळे आरोग्यदायी पदार्थ केव्हाही चांगलेच.
- डॉ. सुयश नाईक, बालरोगतज्ज्ञ,