संजय पाठक नाशिकसामान्यत: उपवासाच्या दिवशी साबुदाण्याच्या खिचडीला पर्याय म्हणून वापरल्या जाणाऱ्या भगरीचा देशपातळीवर वापर केवळ दोन टक्के आहे, तोही मोजक्या राज्यात. त्या पार्श्वभूमीवर आता भगरीचा केवळ उपवास नव्हे तर पोषक अन्न म्हणून वापर करण्यासाठी भगर उत्पादक सरसावले असून, भगरीचे आरोग्यदायी गुणांचा प्रचार करीत ‘भगर खा, फिट रहा’ असा सल्ला दिला जात आहे.द्राक्ष, वाइनसाठी प्रसिद्ध असलेल्या नाशिक जिल्ह्यात सर्वाधिक वायनरी आहेत, परंतु त्याचबरोबर देशात सर्वाधिक भगर उत्पादक नाशिकमध्ये असून, त्याविषयी कोणाला फारशी माहिती नाही. नाशिक मुळातच आदिवासी जिल्हा असून, जिल्ह्यातील आठ तालुके आदिवासीबहुल आहेत. साहजिक त्यांचे प्रमुख पीक असलेल्या वरईला फिनिशिंग करून भगर तयार केली जाते. नाशिकमध्ये ३५ भगर मिल असून, ९० टक्के भगर नाशिकमध्येच तयार होते. उपवासाला वापरली जाणारे हे जुने उत्पादन असले तरी जगन्नाथ-पुरीच्या यात्रेत प्रसाद म्हणून भगरीची खीर चाखणाऱ्या अनेकांना त्याचा उपवासात उपयोग होतो हे माहिती नाही. भगर म्हणजे वरईचा तांदूळ असा समज असल्याने दक्षिणेतील राज्यात भगर उपवसाला चालत नाही. महाराष्ट्र, गुजरात, मध्य प्रदेश, राजस्थान हे भगरीचा वापर करणारे प्रमुख राज्य त्या खालोखाल पंजाब, हरियाणा आणि दिल्ली येथे भगर काही प्रमाणात वापरली जाते. अन्यत्र भगरीचा प्रचार-प्रसार झालेला नाही. आदिवासींना हक्काचे आर्थिक बळ देणाऱ्या भगरीचा उपवासाशीच संबंध जोडला जात असल्याने बहुधा भगरीपासून अन्य अनेक पदार्थ तयार करतात हे अनेकांना माहिती नाही. मात्र आता भगरीतील आरोग्यदायी गुण स्पष्ट करून त्याच्या प्रसारासाठी नाशिकची भगर असोसिएशन सरसावली आहे. भगर ग्लुटेनमुक्त असल्याने बेकरीच्या उत्पादनांसारखा ती अपायकारक नाही. तसेच त्यातील ग्लायसेमिक इंडेक्स कमी असल्याने मधुमेह आणि लठ्ठपणाची कौटुंबिक पार्श्वभूमी असणाऱ्यांना उपयुक्त ठरते, असे असोसिएशनचे म्हणणे आहे. मुळात भगर ही केवळ उपवासासाठीच वापरली जाते हा गैरसमज आहे. साबुदाण्यापेक्षा कैकपटीने चांगले पदार्थ भगरीपासून तयार केले जातात. त्यात भगरीची इडली, लाह्या, उत्तपा, पॅटिस, ठेपले, ढोकळा, थालीपीठ, लाडू, खीर आणि शिरा असे अनेक पदार्थ तयार होतात. त्याचा आता देशभरात विविध माध्यमांतून प्रसार सुरू आहे, असे नाशिक भगर मिल असोसिएशनचे अध्यक्ष महेंद्र छोरिया यांनी सांगितले. ‘भगर खा, फिट’ रहा अशी चळवळ आता सुरू करण्यात आली असून, आहाराविषयी सजग असणाऱ्यांच्या दृष्टीने ही महत्त्वाची बाब असल्याचे ते म्हणाले.
भगर खा, फिट रहा !
By admin | Published: October 17, 2016 12:30 AM