नाशिक : गेल्या आठवड्यात जिल्ह्यात झालेल्या वादळी वारा, गारपीट व अवकाळी पावसामुळे जिल्ह्यातील आठ तालुक्यांतील ५४ गावांमधील ११८४ शेतकऱ्यांच्या शेतपिकांचे नुकसान झाले असून, सुमारे ९४० हेक्टरवरील पिकांना पावसाचा तडाखा बसला आहे. या संदर्भातील प्राथमिक नुकसानीचा अहवाल कृषी खात्याने महसूल विभागाला सादर केला असून, त्यात कमी-अधिक होऊ शकते. मालेगाव, बागलाण, देवळा, नाशिक, इगतपुरी, त्र्यंबकेश्वर, निफाड, सिन्नर तालुक्यांतील ग्रामीण भागात गेल्या आठवड्यात वादळी वारा, गारपीट व अवकाळी पावसाने झोडपून काढले. विजेचा कडकडाट करीत मुसळधार कोसळलेल्या या पावसाने वीज कोसळून आठ बळी घेण्याबरोबरच पशुधनाचेही मोठ्या प्रमाणात नुकसान केले. अचानक आलेल्या पावसाने शेतकºयांची धावपळ उडून, उभ्या पिकाचे नुकसान सोसावे लागले. प्रामुख्याने गहू, कांदा, टोमॅटो, मिरची, भाजीपाला या प्रमुख पिकांबरोबरच द्राक्ष, डाळिंब, लिंबू, आंबा, कलिंगड या फळपिकांनाही फटका बसला. द्राक्षाची बाग वादळी वाºयात कोलमडून पडली तर खळ्यात काढून ठेवलेला उन्हाळ कांदाही पावसामुळे भिजला. टोमॅटोचे सुडे भुईसपाट झाल्या. भाजीपाल्याचेही नुकसान झाले. सलग तीन दिवस अवकाळी पाऊस धुमाकूळ घालत असताना शासनाकडून मात्र नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश देण्यात न आल्याने कृषी व महसूल खाते हात बांधून बसले, परिणामी शेतकºयांनी आणखी नुकसान नको म्हणून आपल्या शेतातील आवरासावर करून घेतली. त्यानंतर चार दिवसांनी शासनाला या अवकाळी पावसाचे गांभीर्य लक्षात आल्यावर त्यांनी नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश दिले. त्यानुसार कृषी, महसूल खात्याने संयुक्तरीत्या पाहणी करून प्राथमिक अहवाल सादर केला असून, त्यात जिल्ह्णातील ५४ गावांमधील शेतीपिकांना अवकाळीचा फटका बसला असून, त्यात सर्वाधिक नुकसान कांद्याचे झाले. ३८२ हेक्टर क्षेत्रावरील कांदा तर त्याखालोखाल ३०५ हेक्टरवरील भाजीपाला पिकाचे नुकसान झाले. २५ हेक्टरवरील गहू, ४ हेक्टरवरील टोमॅटो भुईसपाट झाले. डाळिंबाचे १७१ हेक्टर तर द्राक्षाचे २१ हेक्टरवरील पिके उद्ध्वस्त झाली. चिकू, लिंबू, आंबा, कलिंगड, मिरची, भोपळा, काकडी या पिकांचेही कमी-अधिक प्रमाणात नुकसान झाले. एकूण २१८ हेक्टरवरील फळपिके तर ७२२ हेक्टरवरील बागायती पिकांचे नुकसान झाले आहे.या नुकसानीत राष्टÑीय आपत्ती व्यवस्थापनांतर्गत पिकाचे ३३ टक्क्यापेक्षा कमी व अधिक नुकसानीची पाहणी करण्यात आली. ३३ टक्क्यापेक्षा अधिक नुकसान असल्यासच शेतकºयांना नुकसानीची भरपाई मिळणार असून, त्यापेक्षा कमी असल्यास कोणतीही मदत देय नाही. त्यामुळे ज्यावेळी प्रत्यक्ष बांधावर जाऊन पंचनामे करण्यात येतील व नुकसानीची पाहणी केली जाईल. त्यात खºया अर्थाने नुकसानीचा आकडा निश्चित करता येणार आहे.
अवकाळीने जिल्ह्यातील १२०० शेतकऱ्यांचे नुकसान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 25, 2019 1:34 AM