नाशिक : निर्माल्य नदीपात्रात न टाकता थेट निर्माल्य रथात टाकावे, यासाठी गणेशोत्सव काळात निर्माल्य संकलनासाठी रोटरी एनक्लेव क्लब व महापालिका प्रशासन संयुक्त विद्यमाने ‘निर्माल्य रथ’ कार्यरत ठेवणार आहे. गणेश चतुर्थीपासून या रथाचा शुभारंभ झाला असून अनंत चतुर्दशीपर्यंत रथ कार्यान्वित राहणार असून निर्माल्याचे संकलन करणार आहे. यामुळे गोदावरी नदीचे प्रदूषण रोखण्यास मदत होणार आहे. उत्सव काळात गणपतीला अर्पण केलेली फुले, हार, बेल, शमी, दुर्वा, रुई, नैवेद्य इतर साहित्यांचा पसारा रस्त्यांवर पसरलेले दिसतात. तसेच या निर्माल्याचे वाहत्या पाण्यात म्हणजेच नदीत विसर्जन करण्याची पूर्वापार पद्धत आहे. देवी-देवतांना वाहिलेले निर्माल्य पवित्र समजतात. मोठ्या प्रमाणावर नदीच्या पाण्याचे प्रदूषण होत असते. त्यामुळे मनपा व रोटरीच्या काही जणांनी पुढाकार घेत गणेशोत्सवात शहरात जमणारे सर्व निर्माल्य जमा करून शहर स्वच्छ ठेवणे व नदीचे प्रदूषण टाळण्यासाठी निर्माल्य रथ फिरवण्याची संकल्पना प्रत्यक्षात उतरवली आहे. सदर रथ आजपासून ते विसर्जनापर्यंत दररोज सकाळी १० ते ५ यावेळेत सिडको येथून सुरुवात करणार आहे. तरी या उपक्रमास शहरातील सर्वच नागरिकांनी प्रतिसाद देण्याचे आवाहन रोटरीचे प्रांतपाल राजेंद्र भामरे, अध्यक्ष गुरमित सिंग रावल, मनपा आरोग्य विभागाचे डॉ. बुकाने, डॉ. सचिन हिरे यांनी केले आहे.गणेशोत्सव काळात घरोघरी मोठ्या प्रमाणावर निर्माल्य जमा होत असते. त्यात हे निर्माल्य नागरिकांकडून नदीच्या पाण्यात टाकले जाते. त्यामुळे नदीच्या पाण्याचे मोठ्या प्रमाणावर प्रदूषण होत असते. तसेच काही जण हे निर्माल्य गोदाघाटपरिसरात आणून टाकत असतात. त्यामुळे आम्ही ‘निर्माल्य रथ’ ही नवीन संकल्पना राबवित आहोत. यासाठी मनपाचे आम्हाला मोठे सहकार्य लाभले आहे. सुरुवातील एक निर्माल्य रथ शहरात फिरवला जाणार असून, गरज पडल्यास यामध्ये वाढ करणार आहोत.- गुरमित सिंग रावल, अध्यक्ष, रोटरी एनक्लेव क्लब