संजय पाठक
नाशिक- नदी प्रदुषण रोखण्यासाठी नाशिक महापालिकेने सेवाभावी संस्थांच्या मदतीने राबवलेल्या मूर्ती दान उपक्रमाला चांगला प्रतिसाद मिळाला असून १ लाख ९७ हजार ४८८ मूर्तींचे दान मिळवले आहे. याशिवाय सुमारे १४४ टन निर्माल्य संकलीत केले आहे. त्यामुळे पर्यावरण वाचवण्यास मदत झाली आहे.
नाशिक महापालिकेच्या वतीने दरवर्षी मिशन विघ्नहर्ता राबवले जाते. त्याअंतर्गत गोदावरीसह उपनगरे आणि अन्य जलाशयांचे प्रदुषण टाळण्यासाठी मूर्ती नदीपात्रात विसर्जीत न करता दान देण्याचे आवाहन करण्यात आले होते. दरवर्षी महापालिकेच्या वतीने प्लास्टर ऑफ पॅरीसच्या मूर्तींना नदीपात्रात विसर्जीत करण्यास मनाई केली जाते. मात्र, यंदा शाडु मातीच्या मूर्तीवरील रंग रासायनिक असल्याचे निमित्त करून शाडु मातीच्या मूर्तींना देखील गोदावरी नदीसह अन्य नदीपात्रात मूर्तींच्या विसर्जनास मनाई केली हेाती. ७१ ठिकाणी विसर्जन स्थळीच कृत्रीम कुंड तयार केले होते तसेच मूर्ती दान स्वीकारण्याची देखील तयारी केली होती. त्यामुळे सुमारे दोन लाख मूर्तींचे दान मिळाल्याचे आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी सांगितले.