नाशिक : सध्या जगात मोठ्या प्रमाणात ग्लोबल वार्मिंगमुळे भयानक बदल निसर्गात होत आहे. यामध्ये बेसूमार खाणकाम आणि सीमेंट उद्योगांमुळे मोठा धोका पृथ्वीला निर्माण झाला आहे. प्रगत देशात आता पुन्हा नैसर्गिक साधने वापरून घरे निर्माण केली जातात.आपल्या देशातील एकूण वातावरण पाहून आपण सुद्धा पूर्वीप्रमाणे नैसर्गिक साधने वापरणे गरजेचे आहे. हाच मुख्य संदेश देत बांबू अर्थात ग्रीन स्टिलचा योग्य वापर केला तर मजबूत असे बांधकाम होतेच. याशिवाय निसर्गाला कोणताही धोका पोहोचवत नाही, असा संदेश एक्स्क्लेम २०१९ प्रदर्शनात विद्यार्थ्यांनी दिला आहे, तर आगामी काळात बांबू आणि इतर नैसर्गिक साहित्य वापरण्याचा सल्ला इतरांना देण्याचा मानस विद्यार्थ्यांनी व्यक्त केला आहे.विद्यावर्धन ट्रस्ट यांचे इन्स्टिट्यूट आॅफ डिझाइन इनव्हारमेंट अॅण्ड आर्किटेक्चर अर्थात ‘आयडिया कॉलेज’ नाशिकमध्ये कार्यरत आहे. दरवर्षी कॉलेजकडून ‘एक्सक्लेम’ हे प्रदर्शन भरविण्यात येते. कुसुमाग्रज स्मारकात नुकत्याच पार पडलेल्या या प्रदर्शनाच्या समारोपप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून, अशोका बिल्डकॉनचे कार्यकारी संचालक सतीश पारख, कुसुमाग्रज स्मारकाचे अॅड. विलास लोणारी आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी पारख यांनी विद्यार्थ्यांनी केलेल्या कामाचे कौतुक केले. जगात बांधकाम व्यवसायात होणारे बदल आणि नवीन आव्हाने यावर मार्गदर्शन केले, तर सकाळच्या सत्रात वनाधिपती विनायकदादा पाटील यांनी प्रदर्शनाला भेट देऊन विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
प्रदर्शनात पर्यावरणपूरक संदेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 30, 2019 12:47 AM