नाशिक : विरोधातील सरकार पाडून राज्य मिळवण्यासाठी ईडीचा वापर केला जात असल्याचे आता सर्वमान्य झाले आहे. भाजपच्या विरोधात बोलणारे आणि आरोप करणाऱ्यांवर कारवाई होणारच, मात्र भाजपचे समर्थन करणाऱ्यांना काळजी करण्याचे काही कारण नाही, असा टोला पालकमंत्री छगन भुजबळ यांनी लगावला.
शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यावर ईडीने मंगळवारी (दि. ५) कारवाई केली. त्यानंतर माध्यमांशी संवाद साधताना भुजबळ बोलत होते. ते म्हणाले, ईडी हळूहळू अनेकांची संपत्ती जप्त करत आहे. माझ्यासह अनेकांच्या वडिलोपार्जित संपत्तीची चौकशी सुरू आहे. १९७० पूर्वी माझ्या कुटुंबाने खरेदी केलेल्या जागा ईडीने सील केल्या आहे. इतरांबाबतही अशाच कारवाया सुरू आहेत. त्यामुळे विनाकारण अनेक गोष्टींना तोंड द्यावे लागते, मनस्ताप सहन करावा लागतो. प्रकरण लवकर मिटत नाही. ईडीने देशभरात अनेकांची संपत्ती जप्त करून ठेवली आहे. त्यामुळे ईडीचा दुरूपयोग होतोय, हे आता सर्वांनीच मान्य केले असल्याचे भुजबळ म्हणाले.
विरोधात बोलणाऱ्या व्यक्तींचे काहीतरी प्रकरण शोधून त्याच्यावर कारवाई करायचीच असे त्यांनी ठरवले आहे. यात अनेक नेते भरडले जात असून, लोकशाहीसाठी हे धोकादायक आहे. राऊत यांचा संबंध नसताना त्यांच्यावर कारवाई सुरू आहे. भ्रष्टाचाराशी संबंध असलेले अनेकजण भाजपत जाऊन महाविकास आघाडीवर आरोप आणि भाजपची प्रशंसा करू लागल्याने त्यावरील कारवाई थांबली आहे. भाजपच्या विरोधातील पक्षाची सत्ता असलेल्या राज्यांना खिळखिळे करण्यासाठी ईडीचा सर्रास वापर सुरू असल्याची टीका भुजबळ यांनी केली.