खते, बियाणे महाग; शेतकरी अडचणीत
नांदूरशिंगोटे : परिसरातील शेतकरी वर्ग खरीप हंगामाच्या तयारीला लागला असून, काही दिवसांतच पावसाला सुरुवात होणार असल्याने शेतकरी खते व बियाणांची जुळवाजुळव करीत आहे. मात्र खत आणि बियाणांचे भाव वधारल्याने शेतकऱ्यांचे आर्थिक नियोजन कोलमडले आहे. तसेच नांगरणीचे दरही वाढले आहेत. त्यामुळे बळीराजा मेटाकुटीस आला आहे.
वित्त आयोगाचा निधी वापरता येणार
नांदूरशिंगोटे: ग्रामपंचायतीने कोविड झालेल्या रुग्णांसाठी आपल्या क्षेत्रात ३० किंवा त्यापेक्षा जास्त खाटांच्या विलगीकरण कक्षाची मागणी केल्यास अशा विलगीकरण कक्षास १५ व्या वित्त आयोगाच्या अबाधित प्राप्त निधीच्या २५ टक्के या मर्यादित खर्च करण्याची परवानगी शासनाने दिली आहे. त्यामुळे गावपातळीवर असलेल्या रुग्णांना वेळेस उपचार मिळणे सोपे होणार आहे.
वाढत्या उन्हामुळे रस्त्यावर शुकशुकाट
नांदूरशिंगोटे : गाव परिसरात मे महिन्याच्या अंतिम चरणात उन्हाचा चढता पारा आता असह्य होत आहे. आधीच लॉकडाऊन आणि त्यात उन्हाचे चटके बसत असल्याने दुपारी रस्त्यावर शुकशुकाट दिसून येत आहे. शेती मशागतीच्या कामांना सकाळी लवकरच सुरुवात होत आहे. सकाळी ११ वाजेपासून उन्हाचा पारा वाढल्यानंतर काम थांबवली जातात. दुपारी ४ नंतर काही कामे करण्यास प्राधान्य दिले जात असल्याचे चित्र आहे.
लॉकडाऊन न करता पर्यायी मार्गाची मागणी
नांदूरशिंगोटे : लॉकडाऊनमुळे सामान्य माणसाचे जीवन विस्कळीत होते. अनेक उद्योगधंदे ठप्प पडले आहेत. व्यापाऱ्यांना दुकान भाडे, वीजबिल, कामगारांचा पगार दुकान बंद असले तरीही द्यावा लागतो. लॉकडाऊन झाले तर अनेक नागरिक रोजगारापासून वंचित होतील. त्यामुळे लॉकडाऊन न करता, यातून पर्याय काढावा, अशी मागणी ग्रामीण भागातील व्यापाऱ्यांतून होत आहे.