बाहेरच्या देशांमधून आपल्याकडे खाद्यतेलाची आयात केली जाते. तिकडील सरकारणे निर्यात शुल्कात वाढ केल्याने तेलाच्या दरात वाढ झाली असल्याचे सांगितले जात आहे. जवळपास सर्वच तेलांच्या दरात दररोजच पाच ते दहा रुपयांचा फरक पडत असल्यामुळे सर्वसामान्यांचे महिन्याचे किराणा मालाचे बजेट वाढले आहे. यामुळे अनेकांचे आर्थिक नियोजन कोलमडले आहे. साखर, डाळी आणि इतर किराण्याच्या दरात फारसा फरक पडलेला नाही. मध्यंतरी पालेभाज्यांचे भाव खूपच खाली आल्याने अनेक शेतकऱ्यांनी भाजीपाला पिकावर रोटर फिरविला. त्यानंतर परजिल्ह्यातील भाजीपाल्याचेही नुकसाहन होऊन तो खराब झाल्याने भाजीपाल्याला मागणी वाढली असली तरी त्या तुलनेत आवक होत नसल्याने वांगी, सिमला मिरची, कारले, भोपळा, दोडका आदी सर्वच फळभाज्यांच्या दराने उसळी घेतली आहे. पालेभाज्यांची आवकही ४० ते ५० टक्क्यांवर आली आहे. यामुळे कोथंबीर, मेथी, शेपू, कांदा पात, पालक या पालेभाज्यांच्या दरामध्ये वाढ झाली आहे. फळबाजारातही तेजीचे वातावरण आहे.
चौकट -
सिमला ४० रु. किलो
घाऊक बाजारात सिमला मिरची १८ रुपयांपासून ४० रुपये किलोपर्यंत विकली जात असल्याने किरकोळ बाजारातही सिमला मिरचीसह सर्वच फळभाज्यांचे दर वाढले आहे. गावठी कोथिंबीर १ हजारापासून ४,१५० रुपये शेकड्यापर्यंत विकली जात आहे.
चौकट -
टरबूज ६ रुपये किलो
फळबाजारामध्ये फळांची आवक कमी झाली आहे. यामुळे फळांचे दर वाढले आहेत. बाजारात टरबुजांची आवक सुरू झाली असून घाऊक बाजारात टरबूज ४ रुपयांपासून ९ रुपये सरासरी ६ रुपये किलो दराने विक्री होत आहे. तर बोरांना ५ रुपयांपासून ११ रुपयांपर्यंत दर मिळत आहे.
चौकट -
तांदूळ वाढला
किरकोळ किराणा बाजारात खाद्यतेलांबरोबरच तांदळाच्या दरातही वाढ झाली आहे. तांदळाचे दर क्विंटलमागे २०० ते ४०० रुपयांनी वाढले आहेत. इतर किराणा मालाचे दर स्थिर आहेत. किराणा बाजारात दरवाढीचा ग्राहकीवर परिणाम झाला आहे.
कोट -
दिवसागणिक तेलाच्या दरात वाढ होत असल्याने नेहमीच्या ग्राहकांना काय उत्तर द्यावे, असा प्रश्न आम्हाला पडला आहे. वाढत्या दरामुळे सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले आहे. याबाबत शासनाने काही हस्तक्षेक करायला हवा. - शेखर दशपुते, किराणा व्यापारी
कोट-
मागील महिन्यापासून तेलाचे भाव वाढले असून त्याची जुळवणी करत असतानाच आता पालेभाज्यांनीही उसळी घेतल्यामुळे दररोजच्या स्वयंपाकात नेमके करायचे काय असा प्रश्न निर्माण झाला आहे. महिन्याच्या किराणा खर्चात ४०० ते ५०० रुपयांनी वाढ झाली आहे. - संगीता जगताप, गृहिणी
कोट -
मध्यंतरीच्या काळात भाजीपाल्याचे भाव खूपच गडगडल्याने शेतकऱ्यांना भाजीपाला विक्रीसाठी नेणेही महाग झाले होते. आता भाज्यांच्या दरात सुधारणा झाल्याने निदान उत्पादन खर्च तरी निघू शकेल. वाढीव दराचा फायदा शेतकऱ्यांपेक्षा दलालांना अधिक होतो. - मधुकर खैरनार, शेतकरी