नाशिक : ईडीकडून होत असलेली कारवाई ही राजकीय हेतूनेच होत असल्याचा आरोप पालकमंत्री छगन भुजबळ यांनी केला असून, भाजप सोडून गेलेल्यांना अशा कारवाईच्या माध्यमातून संदेश दिला जात असल्याचा संशयही त्यांनी व्यक्त केला. नाशिक जिल्ह्याच्या कोरोना आढावा बैठकीनंतर पत्रकारांनी भुजबळ यांना खडसे यांच्यावरील कारवाईबाबत विचारले असता ईडीच्या कारवाईला राजकीय वास असल्याचेही भुजबळ यांनी म्हटले. पुणे जिल्ह्यातील भोसरी येथील जमीन खरेदी गैरव्यवहारप्रकरणी सक्त वसुली संचालनालय (ईडी) कडून सध्या राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांची चौकशी सुरू आहे. आपल्यावरील कारवाई ही सुडबुद्धीने केली जात असल्याचा आरोप खडसे यांनी केला आहे. याबाबत भुजबळ यांनीदेखील खडसे यांच्या विधानाचा पुनरुच्चार केला. ईडीकडून होणाऱ्या कारवाईला राजकीय वास नक्कीच असून, भाजप सोडून गेलेल्यांना या माध्यमातून संदेश देण्याचा प्रयत्न भाजपकडून केला जात असल्याचे भुजबळ म्हणाले.
दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्रातील कोरोनास्थितीबाबत चिंता व्यक्त केल्याचे भुजबळ यांना विचारले असता देशातील इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रातील कोरोना स्थिती ही चांगली आहे. नाशिक आणि मुंबईतही कोरोना नियंत्रणात येत असल्याचे सांगून शितावरून भाताची परीक्षा होते असे भुजबळ म्हणाले. पंतप्रधानांनी जास्तीत जास्त लसीकरणाला प्राधान्य देण्यासाठी नियोजन केले तर कोरोनावर आणखी लवकर नियंत्रण मिळविता येईल, असा टोलाही त्यांनी लगावला. विधानसभा अध्यक्षपद हे काँग्रेसलाच दिले जाणार असल्याचा पुनरुच्चार त्यांनी केला.
--इन्फो--
भुजबळांनी राणे यांना फोन करून दिल्या शुभेच्छा
महाराष्ट्रातील नेते नारायण राणे यांना केंद्रात मंत्रिपद मिळाल्याने आपण स्वत: त्यांना फोन करून शुभेच्छा दिल्याचे भुजबळ यांनी सांगितले. राणे यांना सूक्ष्म, लघू व मध्यम उद्योग मंत्रिपद देण्यात आले आहे. कोणतेही खाते कमी महत्वाचे नसून मंत्री आपल्या कामानुसार त्या खात्याला महत्त्व मिळवून देत असल्याचेही भुजबळ म्हणाले.
--इन्फो--
आंदोलनांना होणारी गर्दी चुकीचीच
जिल्ह्यात सध्या अनेक प्रश्नांवर आंदोलने केली जात असून, अशा आंदोलनाच्या ठिकाणी निर्बंध नियमांकडे दुर्लक्ष होत असेल तर यंत्रणांनी अशा आयोजकांवर कारवाई केली पाहिजे, असे भुजबळ यांनी सांगितले. आंदोलनकर्त्यांनीदेखील आपली स्वत:ची काळजी घेतली पाहिजे, असेही ते म्हणाले. आपल्या हक्कासाठी, न्यायासाठी आंदोलनाचा अधिकार प्रत्येकाला असल्याने आंदोलने होत असल्याचेही ते म्हणाले.