नाशिक : जिल्हा परिषदेच्या सहा विषय समित्यांचे वाटप बुधवारी (दि. ५) करण्यात येऊन अपेक्षेनुसारच उपाध्यक्ष प्रकाश वडजे यांनी बांधकाम व अर्थ समिती आपल्याकडे ठेवण्यात यश मिळविले. अध्यक्ष विजयश्री चुंबळे यांनी विषय समित्यांचे खातेवाटप जाहीर केले. त्यात बांधकाम व अर्थ समिती उपाध्यक्ष प्रकाश वडजे यांना, शिक्षण व आरोग्य समिती किरण थोरे यांना, तर कृषी व पशुसंवर्धन समिती भाजपाच्या केदा अहेर यांना जाहीर केली.विशेष सभेचे कामकाज दुपारी १ वा. सुरू झाले. तत्पूर्वी १२.३०वाजेपासून रिक्त असलेल्या विविध समित्यांवर २३ जागांसाठी ३८ अर्ज दाखल करण्यात आले होते, तर १ वाजता त्यात चार अर्जांची भर पडली. विशेष सभेचे कामकाज सुरू होताच अध्यक्ष विजयश्री चुंबळे, यांनी विषय समिती वाटपाची घोषणा केली. त्यात बांधकाम व अर्थ समिती उपाध्यक्ष प्रकाश वडजे, यांना शिक्षण व आरोग्य किरण पंढरीनाथ थोरे यांना, तर कृषी व पशुसंवर्धन केदा अहेर यांना देण्यात येत असल्याचे जाहीर केले. त्यानंतर शैलेश सूर्यवंशी यांनी तीनही पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन केले, तर बाळासाहेब गुंड यांनी त्यास अनुमोदन दिले. विषय समित्यांच्या रिक्त असलेल्या पदांवर सदस्यांचे एकमत न झाल्याने अखेर ही सभा तहकूब करण्याची सूचना रवींद्र देवरे यांनी मांडली. त्यास केरू पवार यांनी अनुमोदन दिले. त्यानंतर सभा तहकूब करण्यात येत असून, नवीन सभेची तारीख येत्या ७ दिवसांत देण्यात येईल, असे अध्यक्ष विजयश्री चुंबळे, यांनी जाहीर केले. यावेळी उपाध्यक्ष प्रकाश वडजे, सभापती किरण थोरे, समाजकल्याण सभापती उषा बच्छाव, महिला व बालकल्याण समिती सभापती शोभा डोखळे यांच्यासह सर्व सदस्य व खातेप्रमुख उपस्थित होते. (प्रतिनिधी)
शिक्षण व आरोग्य किरण थोरे, तर कृषी व पशुसंवर्धन केदा अहेर यांच्याकडे
By admin | Published: November 05, 2014 10:48 PM