नाशिक : भारतातील व्यक्तींची दैनंदिन जीवन प्रणाली व शिक्षण यांच्यात कोणताही ताळमेळ बसताना दिसून येत नाही किंबहुना देशातील मानवी जीवन आणि शिक्षण यात मोठ्या प्रमाणात विसंगती असल्याचे असे मत ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ रमेश पानसे यांनी व्यक्त केले आहे.क्रांतिवीर व्ही. एन. नाईक महाविद्यालयात शिक्षण बदलतंय! आपणही बदलूया का? या विषयावर बोलताना त्यांनी शिक्षक ांना मार्गदर्शन केले. अध्यक्ष संस्थेचे शिक्षणाधिकारी साहेबराव कुटे यांच्यासह व्यासपीठावर प्राचार्य डॉ. शांताराम बडगुजर उपस्थित होते. रमेश पानसे म्हणाले, आजची शिक्षणपद्धती विसाव्या शतकातील असून, त्यात व आजच्या व्यवहार ज्ञानात मोठ्या प्रमाणात तफावत निर्माण झाली आहे. जो शिकण्यासाठी मदत करतो तोच खरा शिक्षक असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.विद्यार्थ्याला स्वत: विचार करता यावा, त्याच्या कल्पकतेला वाव मिळावा ही उद्दिष्टे समोर ठेवून शिक्षकाने काम केले पाहिजे, असा सल्लाही त्यांनी यावेळी दिला. प्रास्ताविक प्राचार्य डॉ. शांताराम बडगुजर यांनी केले. प्रा. शरद काकड यांनी सूत्रसंचालन करून आभार मानले.
शिक्षण आणि मानवी जीवनात विसंगती : रमेश पानसे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 06, 2019 12:23 AM