नाशिक : महापालिकेच्या शिक्षण विभागाकडून शिक्षक दिनी आदर्श शिक्षक पुरस्काराची घोषणा होऊन महिना उलटला तरी अद्याप पुरस्कार वितरण सोहळ्याला मुहूर्त लाभू शकलेला नाही. दरम्यान, अपक्ष नगरसेवक असलेल्या शिक्षण सभापतींना आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्षांतराचे वेध लागल्याची चर्चा असून गौरव सोहळ्यासाठी त्यांनी पालकमंत्र्यांना गळ घातली असल्याचे समजते; मात्र पालकमंत्र्यांची तारीख मिळत नसल्याने शिक्षक गौरव सोहळा लटकला आहे. महापालिकेमार्फत देण्यात येणाऱ्या शिक्षक पुरस्कारांचे वितरण चार वर्षांपासून थांबले आहे. वर्षभरापूर्वी शिक्षण सभापतिपदी संजय चव्हाण आणि उपसभापतिपदी गणेश चव्हाण यांची निवड झाल्यानंतर संजय चव्हाण यांनी या वर्षापासून पुन्हा शिक्षक पुरस्कार देण्याची योजना सुरू केली. शिक्षक दिनाच्या निमित्ताने विविध संस्थांच्या वतीने देण्यात येणाऱ्या पुरस्कारांसाठी अनेकदा अर्ज करावे लागतात, परंतु यंदा महापालिका शिक्षण मंडळाने अशाप्रकारे कोणत्याही प्रकारे अर्ज न मागवता शिक्षकांची माहिती संकलित करून त्यांना पुरस्कार जाहीर करण्याचा निर्णय घेतला आणि त्यानुसार १७ शिक्षकांची निवड करण्यात आली. शिक्षकदिनीच ५ सप्टेंबरला पुरस्कारांची घोषणा करण्यात आली. तत्पूर्वी सभापती संजय चव्हाण यांनी शिक्षकदिनीच कालिदासला पुरस्कार सोहळा आयोजित करण्याचेही जाहीर केले होते. परंतु नंतर शिक्षण समितीचे माजी सभापती रमेश शिंदे यांच्या निधनामुळे सोहळा रद्द करण्यात आल्याचे कारण देण्यात आले. आता महिना उलटला तरी शिक्षक गौरव सोहळ्याला मुहूर्त लाभत नसून संबंधित शिक्षकांना पुरस्कार जाहीर होऊनही त्या पुरस्काराचा आनंद घेता येत नाही, अशी स्थिती निर्माण झाली आहे. पुरस्कार सोहळ्यासाठी सभापतींनी पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या नावाचा आग्रह धरला आहे परंतु त्यांची अद्याप तारीख मिळत नसल्याने पुरस्कार सोहळाही लटकला आहे. (प्रतिनिधी)
शिक्षण सभापतींची ‘मेरी मर्जी’
By admin | Published: October 06, 2016 1:35 AM