नाशिक : काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांची राज्यातील शिक्षण तसेच सहकारी संस्थांवर मजबूत पकड असल्याने विरोधकांचे खच्चीकरण करण्यासाठी सरकारने काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसची पाळेमुळे उखडण्यासाठी शिक्षण व सहकार क्षेत्रावर घाला घातल्याचा गंभीर आरोप माजी केंद्रीयमंत्री विजय नवल पाटील यांनी केला आहे. शिक्षण संस्थाचालकांच्या विविध प्रलंबित मागण्यांसदर्भात नाशिकमधील व्ही. एन. नाईक अभियांत्रिकी महाविद्यालयात महाराष्ट्र राज्य शिक्षण संस्था महामंडळाच्या बैठकीनंतर सोमवारी (दि. २९) पत्रकारांशी बोलताना त्यांनी सरकारवर हल्लाबोल केला. राज्यातील अनेक शिक्षण संस्थांमध्ये विनाअनुदानित संस्थांमध्ये कार्यरत शिक्षक वेतनाच्या प्रतीक्षेत असून, अनेक शिक्षक ४० ते ४५ वर्षांचे झाले आहेत. तरीही मिळेल त्या मानधनावर काम करून अविरतपणे अध्यापकनाचे काम करीत आहेत. परंतु, सरकार मात्र शिक्षण आणि सहकार क्षेत्रात राजकारण करून या क्षेत्रातील प्रस्थापितांचे खच्चीकरण करून विरोधकांना कमकुवत करू पाहत असल्याचा आरोप त्यांनी केला. राज्यातील सरकार शिक्षक व शिक्षण संस्थांप्रती उदासीन असून, शिक्षकांमध्ये भाजपा सरकारविरोधात प्रचंड असंतोष असल्याचे सांगनाच याची प्रचिती आपल्याला विधान परिषद निवडणुकीच्या माध्यमातून आल्याचे विजय नवल पाटील यांनी सांगितले. अनिकेत पाटील यांना भाजपाकडून उमेदवारी मिळताच शिक्षकांनी आपल्याला फोन करून मतदान करणार नाही, असे सांगितले होते, असा गौप्यस्फोटही पाटील यांनी केला.
विरोधकांची पाळेमुळे उखडण्यासाठी शिक्षण, सहकारावर घाला :विजय नवल पाटील
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 29, 2018 11:48 PM