नाशिक : जनसेवा हीच ईश्वर सेवा असे व्रत मानून अनेक सेवाभावी संस्था-संघटना कार्य करतात. परंतु त्यात सातत्य नसते. विशिष्ट कालखंडानंतर हा उपक्रम खंडित होतो. याला कारण म्हणजे एक पिढीकडून दुसऱ्या पिढीपर्यंत हा सामाजिक बांधिलकीचा वारसा पोहचत नाही. परंतु काही सेवाभावी संस्था मात्र अखंडपणे कार्य करतात. विवेकानंद प्रशिक्षण व सेवा प्रकल्पामार्फत मात्र गेल्या तीस वर्षांपासून आदिवासी भागात ३० पाड्यांवर शिक्षण व आरोग्याची जनजागृती करण्यात येत आहे. शहरातील काही सेवाभावी संस्था दिवाळी आणि अन्य सण उत्सव काळात आदिवासी पाड्यावर जाऊन फराळ आणि कपडे वाटप करतात. नंतर वर्षभर या भागात फिरकत नाही तसेच चार-पाच वर्षांनंतर हा उपक्रमदेखील बंद पडतो. परंतु गेल्या तीस वर्षांपासून सुमारे तीस आदिवासी पाड्यांवर जाऊन शिक्षण आणि आरोग्य विषयक जनजागृतीचा उपक्रम राबविण्यात येत आहे.विवेकानंद केंद्र नाशिक शाखा, नाशिकरोड येथील सावरकर विस्तार केंद्र आणि महाराष्ट्र मित्रमंडळ विष्णूनगर यांच्या संयुक्त विद्यमाने गेल्या तीस वर्षांपासून त्र्यंबकेश्वर, हरसूल आणि पेठ भागांतील तीस पाडे दत्तक घेण्यात आले आहेत.अखंडपणे उपक्रम सुरूदरवर्षी या भागात तीन-चार संस्थेचे कार्यकर्ते दर महिन्याला नियमितपणे क्रमाक्रमाने जातात. तेथे आदिवासी बांधवाबरोबर बैठका, सभा आणि गटचर्चा याद्वारे त्यांच्या समस्या जाणून घेतात. त्याचप्रमाणे आपल्याकडील पाणी, इंधन व अन्य वस्तूंचे योग्य व्यवस्थापन व नियोजन कसे करावे, मुलांना व मुलींना शिक्षणाची आवश्यकता कशी आहे हेदेखील पथनाट्यातून सांगितले जाते. आरोग्य शिबिरे घेतली जातात. त्याचप्रमाणे सामाजिक संस्थेमार्फत जमा झालेले कपडे व फराळ यांचेदेखील योग्य पद्धतीने वाटप करण्यात येते. विवेकानंद प्रशिक्षण व सेवा प्रकल्प पिंपळद यांच्यामार्फत हा उपक्रम अखंडपणे सुरू आहे.
पथनाट्यातून तीस आदिवासी पाड्यांवर शिक्षण, आरोग्य जागृती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 25, 2018 12:53 AM