नाशिकरोड : गेल्या दोन वर्षांत नाशिकरोड मध्यवर्ती कारागृहात गैरवर्तन करणाºया ७२ कैद्यांविरुद्ध कारागृह प्रशासनाने कारागृहीन शिक्षा ठोठावली आहे. त्यापैकी ६० कैद्यांच्या कारागृहीन शिक्षेच्या प्रस्तावावर जिल्हा न्यायालयाने मान्यता दिली आहे. कारागृहाचे नियम, कायदे असून, त्यांचे पालन करणे कैद्याचे कर्तव्य आहे. त्या नियमांचे उल्लंघन, गैरवर्तन केल्यास कारागृहीन शिक्षेची कार्यवाही प्रस्ताव करण्यात येतो. कारागृहात अधिकारी, कर्मचारी सहकारी कैदी यांच्याशी गैरवर्तन करणे, मोबाइलचा वापर करणे, अमली पदार्थ बाळगणे, वादविवाद, मारामारी करणे, पैसे जवळ बाळगणे आदी कारणास्तव जानेवारी २०१६ पासून १६ फेब्रुवारी २०१८ पर्यंत गैरवर्तन करणाºया शिक्षा भोगणाºया व न्यायालयीन ७२ कैद्यांविरुद्ध कारागृहीन शिक्षेचा प्रस्ताव तयार केला. सदर प्रस्ताव तयार करताना त्या सर्कलमधील कैद्यांचे व संबंधित अधिकारी, कर्मचारी यांचे जबाब घेण्यात आले. ७२ कैद्यांविरुद्ध कारागृह प्रशासनाने कारागृहीन शिक्षेचा प्रस्ताव जिल्हा न्यायालयकडे सादर करण्यात आला. त्यापैकी ६० कैद्यांच्या प्रस्तावाला न्यायालयाने मान्यता दिल्याचे कारागृह अधीक्षक राजकुमार साळी यांनी सांगितले. कारागृहीन शिक्षेच्या प्रस्तावाला न्यायालयाने मान्यता दिल्याने संबंधित कैद्याला रजा, सुट्टी, शिक्षेत माफी या सुविधा दिल्या जात नाही. यापुढे त्यांना टेलिफोन सुविधा किंवा खुल्या कारागृहात पाठविण्यात येणार नाही.
कारागृहात गैरवर्तन करणाऱ्या कैद्यांना शिक्षा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 25, 2018 12:10 AM