नाशिक : जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळांना आकारण्यात येणारी वीज दर कर आकारणी ही घरगुती दरानेच आकारण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला असल्याची माहिती शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी अध्यक्ष विजयश्री चुंबळे यांना दिली. जिल्हा परिषदेच्या शाळांना व प्राथमिक आरोग्य केद्रांना महाराष्ट्र वीज वितरण कंपनीच्या वतीने वाणिज्य दराने वीज दर आकारणी केली जाते. त्यामुळे जिल्हा परिषदेच्या बहुतेक शाळांना व प्राथमिक आरोग्य केद्रांना वीज देयके भरणे अवघड होते. वाणिज्य दराने भल्या मोठ्या प्रमाणात वीज देयके येत असल्याने जिल्हा परिषदेच्या शाळा व दवाखान्यांची वीज देयकांची थकबाकी वाढते. परिणामी बहुतांश ठिकाणी वीज देयके न भरल्याने विजेचा पुरवठा खंडित करण्यात येत असल्याच्या तक्रारी येतात. त्यामुळे अध्यक्ष विजयश्री चुंबळे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह पालकमंत्री गिरीश महाजन,ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे व शिक्षणमंत्री विनोद तावडे यांना जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळांना व प्राथमिक आरोग्य केंद्रांना वाणिज्य ऐवजी घरगुती दराने वीज देयकांची दर आकारणी करावी, अशी मागणी यापूर्वीच केली होती. रविवारी नाशिक दौऱ्यावर आलेले शिक्षणमंत्री विनोद तावडे यांची अध्यक्ष विजयश्री चुंबळे यांनी भेट घेऊन याबाबत चर्चा केली असता तावडे यांनी जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळांना घरगुती दराने वीज आकारण्याचा मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय झाल्याची माहिती दिली. तसेच जिल्हा परिषदेच्या ग्रामीण भागातील खेळाडूंना राज्यस्तरावर प्रोत्साहन मिळण्यासाठी जिल्हा परिषद अध्यक्ष चषक स्पर्धा राज्यस्तरावरूनही खेळविण्याबाबत आश्वासन दिले. (प्रतिनिधी) फोटो कॅप्शन- १६ पीएचएफबी-६७- शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्याशी चर्चा करताना अध्यक्ष विजयश्री चुंबळे. समवेत डावीकडून भगवान सूर्यवंशी, दत्तात्रय जगताप, खासदार हरिश्चंद्र चव्हाण आदि.
शाळांना घरगुती दरानेच वीज आकारणी शिक्षणमंत्री विनोद तावडेंनी दिली विजयश्री चुंबळेंना ग्वाही
By admin | Published: February 17, 2015 12:02 AM