नाशिक : महापालिका निवडणुकीत पक्षाने उमेदवारी न दिल्याने आपली उमेदवारी कायम ठेवून पक्ष आदेश डावलणाऱ्यांची संख्या डझनभर असताना महिला आघाडीच्या उपजिल्हाप्रमुख लक्ष्मीबाई ताठे यांची पक्षातून एकीकडे हकालपट्टी करणाऱ्या सेनेच्या नेतृत्वाने दुसरीकडे महानगरप्रमुखांना थेट चोप देणाऱ्या विनायक पांडे यांना अभय देण्याची बाब सामान्य सैनिकांना खटकली आहे. ताठे यांनी महापालिकेत अपक्ष उमेदवारी केल्यामुळे त्यांना ही शिक्षा दिली की, पांडे यांच्या कृत्यात त्याही सहभागी होत्या म्हणून कारवाई झाली याबाबत उलटसुलट चर्चा सुरू आहे. शिवसेनेच्या मुखपत्रात लक्ष्मीताई ताठे यांच्या हकालपट्टीचे वृत्त प्रसिद्ध करण्यात आले असून, पक्षविरोधी कारवाया केल्याच्या कारणावरून पक्षाचे सचिव खासदार अनिल देसाई यांनी ही हकालपट्टी केल्याचे वृत्तात म्हटले आहे. ताठे या महिला आघाडीच्या जिल्हा उपप्रमुख म्हणून कार्यरत असून, त्यांनी पंचवटीतील प्रभाग क्रमांक ४ मधून सेनेकडून उमेदवारी मागितली होती. तथापि, पक्षाने त्यांना उमेदवारी नाकारल्याने त्यांनी अपक्ष म्हणून रिंगणात राहण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र माघारी होण्यापूर्वीच पक्षाने त्यांची हकालपट्टी केल्यामुळे आश्चर्य व्यक्त केले जात आहे. ताठे यांनी फक्त अपक्ष राहण्याचा निर्णय घेतल्यामुळेच पक्षाने ही कारवाई केली असेल, तर ताठे यांच्याप्रमाणे शहरात डझनभर बंडखोरांनी पक्षाच्या अधिकृत उमेदवारांविरुद्ध आव्हान उभे केलेले असल्याने त्यांच्यावर कोणतीच कारवाई झालेली नसल्याने ताठे यांच्याविरुद्धच कारवाई का असा प्रश्नही विचारला जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार पक्षाच्या उमेदवारांना एबी फॉर्म वाटप करताना स्थानिक नेतृत्वाने घातलेल्या गोंधळातून कॉँग्रेसच्या एका नेत्याच्या हॉटेलमध्ये महानगरप्रमुख अजय बोरस्ते यांना झालेल्या मारहाणीत विनायक पांडे, कल्पना पांडे यांच्याप्रमाणेच ताठे यांचाही हात असल्याची चर्चा असून, त्यातूनच पक्षाने त्यांच्यावर हकालपट्टीची कारवाई केल्याचे बोलले जात आहे. एकाच घटनेत दोघांना वेगवेगळे न्याय दिल्यानेसेना पदाधिकाऱ्यांनी नेमके काय साध्य केले याबाबत बोलले जात आहे. ताठे यांची कारवाई पक्ष विरोधी नक्कीच असल्याने त्याचे समर्थन कोणी करू शकत नसले तरी, या हाणामारीत विनायक पांडे व कल्पना पांडे यांचाही हात असल्याचे जाहीर झाले आहे. त्यांच्यावर मात्र पक्षाने मेहेरबानी दाखविली आहे. (प्रतिनिधी)
शिक्षा ताठेंना, अभय पांडेंना
By admin | Published: February 10, 2017 12:30 AM