नाशिक : ‘नीट’ प्रकरणी शासनाच्या भूमिकेमुळे विद्यार्थ्यांवर मोठा ताण निर्माण झाला असून, ‘नीट’बाबत शैक्षणिक आणीबाणी लागू करावी, अशी मागणी स्वाभिमान संघटनेच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांची मानसिक स्थिती आणि क्लासेसकडून होणारी लूट लक्षात घेता विद्यार्थ्यांना मोफत कोचिंग मिळावे, अशी मागणीही करण्यात आली.न्यायालयाच्या आदेशाने देशभरातील वैद्यकीय अभ्यासक्रमासाठी नीट ही एकच परीक्षा बंधनकारक करण्यात आली आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील विद्यार्थी चिंतेत असून, परीक्षेसाठीचा काळ अत्यल्प असल्यामुळे वैद्यकीय प्रवेश घेण्याचे स्वप्न धूसर होण्याची शक्यता विद्यार्थी आणि पालक व्यक्त करीत आहे. न्यायालयाचा आदेश असल्याने विद्यार्थ्यांना नीट परीक्षा द्यावीच लागणार असून, दीड महिन्यात १०५ चॅप्टरचा अभ्यासक्रम पूर्ण करण्याचे आवाहन विद्यार्थ्यांसमोर आहे. याचाच फायदा घेत काही खासगी क्लासेसचे संचालक विद्यार्थ्यांकडून हजारो रुपयांचे शुल्क उकळत आहे. विद्यार्थ्यांची होणारी आर्थिक पिळवणूक लक्षात घेता जिल्हाधिकाऱ्यांनी शैक्षणिक आणीबाणी लागू करीत या विद्यार्थ्यांना मोफत कोचिंग देण्याचे बंधन क्लासेस संचालकांना घालावे, अशी मागणी स्वाभिमानने केली आहे. नीट परीक्षेपासून विद्यार्थी वंचित राहू नये आणि क्लासेसकडून होणारी लूट थांबविण्यासाठी योग्य ती कारवाई करण्यात यावी, अशी मागणी जिल्हाध्यक्ष डॉ. संदीप कोतवाल, जुनेद शेख, अविनाश साबळे, अनिल जवरे यांनी केली आहे. (प्रतिनिधी)
शैक्षणिक आणीबाणी लागू करावी‘
By admin | Published: May 16, 2016 11:43 PM