नाशिक : कोविड-१९ मुळे यंदा नव्या सरकारकडून राज्यभरात वनमहोत्सव अभियानाच्या स्वरूपात राबविला जाणार नाही. नाशिक पश्चिम वनविभागाकडे विविध रोपवाटिकांमध्ये एकूण १८ लाख ८३ हजार रोपांची सध्यस्थितीत उपलब्धतता आहे.दरवर्षी १ जुलैपासून महिनाभर वनमहोत्सव राज्यस्तरावर सरकारकडून साजरा केला जातो. मागील वर्षी ५० कोटी रोपे लागवडीचे ‘टार्गेट’ तत्कालीन सरकारने पूर्ण केले. यावर्षी नव्या सरकारकडून प्रारंभी राज्यात १० कोटी रोपांची लागवड करून वनमहोत्सव साजरा करण्याची घोषणा केली गेली; मात्र अचानकपणे आलेल्या कोरोनाच्या महासंकटाने राज्य हादरले! कोरोना आजाराचा मुकाबला करण्यासाठी अखेर राज्य सरकारला वनमहोत्सवाचे अभियान रद्द करत यासाठी राखीव ठेवलेल्या निधीपैकी ६७ टक्के निधी कोविड उपाययोजांकडे वळवावा लागल्याची माहिती महसूलच्या सुत्रांनी दिली आहे. यामुळे यंदा वनमहोत्सव अभियानाच्या स्वरूपात शहरासह जिल्ह्यात साजरा होणार नाही; मात्र वनविभाग, सामाजिक वनीकरण, वनविकास महामंडळाकडून नियमितपणे स्वयंस्फूर्तीने रोपांची लागवड वनजमिनीवर केली जाणार आहे. यासाठी कुठल्याहीप्रकारचे उद्दिष्टय यंदा वनखात्याच्या कुठल्याही विभागाने डोळ्यापुढे ठेवलेले नाही; मात्र वनविभाग प्रादेशिकच्या पुर्व व पश्चिम भागाकडून राज्य आराखड्यांतर्गत वृक्षलागवडीचे ‘टार्गेट’ पार पाडले जाणार आहे. वनमहोत्सवाचा कालावधी सप्टेंबरपर्यंत असल्याने नागरिकांनाही यानिमित्त अत्यंत वाजवी अशा शासकिय दराने रोपे दराने दिली जाणार आहे.
नाशिक पश्चिम वनविभागाकडे विविध रोपवाटिकांमध्ये एकूण १८ लाख ८३ हजार रोपांची सध्यस्थितीत उपलब्धतता आहे. या विभागाकडून नाशिक, सिन्नर, इगतपुरी, त्र्यंबकेश्वर या परिक्षेत्रांतर्गत विविध गावांमध्ये ३२ हेक्टर जागेवर एकूण ११ लाख ५४ हजार रोपांची लागवड केली जाणार असल्याची माहिती उपवनसंरक्षक शिवाजी फुले यांनी दिली.