आगार व्यवस्थापकास कचरा कुंड्यांची भेट
मालेगाव : येथील नवीन बस स्थानकात भाजपतर्फे आगार व्यवस्थापक किरण धनवटे यांना प्लॅस्टिकच्या कचरा कुंड्यांची भेट देण्यात आली. बस स्थानक परिसरात मोठ्या प्रमाणात अस्वच्छता असून, कचरा कुंड्यांचा वापर स्वच्छतेसाठी करावा, असे आवाहन सुनील गायकवाड यांनी केले. यावेळी शीतल वाघ, भरत बागूल, नितीन पोफळे, शरद चौधरी, भाग्येश वैद्य, मदन गायकवाड आदि उपस्थित होते.
मालेगाव शहरातील रस्ते दुरुस्तीची मागणी
मालेगाव : शहरातील पूर्व भागात ठिकठिकाणी रस्त्यांची दुरुस्ती सुरू असून, रस्त्यांवर पडलेल्या खड्ड्यांमध्ये खडी टाकून केवळ डागडुजी केली जात आहे. रस्त्यांना थिगळ न लावता रस्त्यांवर डांबर व खडी टाकून मजबुतीकरण करण्यात यावे, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.
मोफत कर्करोग तपासणी शिबिर
मालेगाव : तालुक्यातील दाभाडी येथे ग्रामीण रुग्णालय व नाशिकच्या मानवता केअर यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत कर्करोग तपासणी व उपचार शिबिर घेण्यात आले. प्रमुख पाहुणे म्हणून तालुका वैद्यकीय अधिकारी शैलेश निकम होते. यावेळी डॉ. कांचन पाठक यांनी महात्मा जोतिबा फुले जनआरोग्य योजनेची माहिती दिली. कार्यक्रमास संजय फतनानी, नीळकंठ निकम, हरिदादा निकम उपस्थित होते. सूत्रसंचालन अमोल निकम यांनी केले.
मालेगावी बर्ड फ्लूची भीती
मालेगाव : शहरासह तालुक्यात मोठ्या प्रमाणात पोल्ट्री व्यवसाय केला जातो; परंतु देशात काही ठिकाणी बर्ड फ्लूमुळे कोंबड्या दगावत असल्याने पोल्ट्री व्यावसायिकात चिंता व्यक्त होत आहे. बर्ड फ्लूमुळे कुक्कुटपालन व्यवसाय करणाऱ्यांसह शेतकऱ्यांमध्येही घबराट पसरली आहे. यामुळे चिकनच्या दरात घसरण झाली आहे.
गटारी, नाले स्वच्छतेची मागणी
मालेगाव : शहरातील पूर्व भागात मोठ्या प्रमाणात गटारी तुंबल्या असून, गटारीचे पाणी रस्त्यांवरून वाहत असल्याने पादचाऱ्यांना दुर्गंधीचा सामना करावा लागत आहे. महापालिकेने शहरातील गटारी व नाल्यांतील घाण कचरा उचलावा. ठिकठिकाणी कचरा कुंड्या ठेवाव्यात. काही भागात घंटागाडी जात नसल्याची तक्रार आहे. गटारीतून काढलेली घाण वेळेवर उचलली जात नसल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.